अखेर बिहारचे एसपी विनय तिवारी 'बॅक टू पॅव्हेलियन'

पूजा विचारे
Friday, 7 August 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी पाटनाहून आलेले एसपी विनय तिवारी यांची अखेर क्वारंटाईनमधून सुटका केली आहे. त्यामुळे तिवारी पुन्हा बिहारला परत जाणारेत.

मुंबईः अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी पाटनाहून आलेले एसपी विनय तिवारी यांची अखेर क्वारंटाईनमधून सुटका केली आहे. त्यामुळे तिवारी पुन्हा बिहारला परत जाणारेत. मुंबई महापालिकेने त्यांना क्वारंटाईन संपवण्याची मुभा दिली आहे. तिवारी यांनी मुंबईत आल्याबरोबर पालिकेने क्वॉरंटाइन केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे अखेर पालिकेनं त्यांची क्वॉरंटाइनमधून मुक्तता केलीय. तिवारींना बळजबरीने होम क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला होता.

सुशांतसिंह राजपूत याच्या वडिलांनी बिहारमध्ये सुशांत आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलिसांचं एक पथक मुंबईत आलं होतं. या पथकाने तपासही सुरू केला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाटनाहून पोलिस अधीक्षक विनय तिवारी आणि चार अधिकारी दोन ऑगस्टला रात्री मुंबईला आले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विनय तिवारी यांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन केले. 

 

बीएमसीने एसएमएसद्वारे मला कळवले आहे की मी होम क्वारंटाईन सोडून जाऊ शकतो. मी आता पाटण्याला रवाना होणार असल्याचं विनय तिवारी यांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितले. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.   तिवारींसह आलेले चार पोलिस अधिकारी कालच पाटण्याला परतले, तर तिवारी आज निघणार आहेत.

 

नेमकं काय घडलं? 

एसपी विनय तिवारी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आले होते. मात्र मुंबईत येताच तिवारी यांना मुंबई पालिकेनं १४ दिवसांसाठी होम क्वॉरंटाइन केलं होतं. त्यांना या १४ दिवसांत बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.  शिवाय क्वॉरंटाइनबाबतचे सरकारी नियमही दाखविण्यात आले होते. त्यामुळे बिहार विरुद्ध मुंबई पोलिस असा संघर्ष निर्माण होऊन मोठा गदारोळ झाला होता. पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांनी बीएमसीने जाणूनबुजून क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी व्हिडीओ ट्वीटद्वारे केला.

हेही वाचाः  खास बातमी, कोरोना संदर्भात मुंबईकरांसाठी 'ही' दिलासादायक माहिती

क्वॉरंटाइनमधून मुक्तता करण्यासाठी पालिकेने विनय तिवारी यांच्याकडे काही अटी ठेवल्या होत्या. ८ ऑगस्टनंतर महाराष्ट्र सोडू शकता. त्यापूर्वी पालिकेला बिहारला जाण्याचं रिटर्न तिकीट दाखवावं लागेल. विमानतळापर्यंत खासगी कारनेच जावं लागेल. तसेच एसओपीचं पालन करावं लागेल. प्रवासादरम्यानही सर्व नियमांचं पालन करावं लागेल, अशा अटीही पालिकेने घातल्या होत्या. तिवारी यांनी बिहारला जाण्याचं रिटर्न तिकीट दाखवल्यामुळेच त्यांची क्वॉरंटाइन मुक्तता करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

BMC released Bihar IPS officer Vinay Tiwari from home quarantine


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC released Bihar IPS officer Vinay Tiwari from home quarantine