मुंबईचे मच्छीविक्रेते फुले मंडईतच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

क्रॉफर्ड मार्केटमधील मच्छीविक्रेत्यांना हटवणार नाही. त्याच ठिकाणी त्यांची पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे आश्‍वासन मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले...

मुंबई : महात्मा फुले मंडईची (क्रॉफर्ड मार्केट) डागडुजी होईपर्यंत मच्छीविक्रेत्यांची त्याच ठिकाणी पर्यायी व्यवस्था केली जाईल. त्यांना स्थलांतरित केले जाणार नाही, असे आश्‍वासन महापालिका आयुक्तांनी दिले आहे. मंडईतील मासळी विक्रेत्यांना मुंबईबाहेर हलवण्याच्या प्रश्‍नावर सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

क्रॉफर्ड मार्केटजवळील शिवाजी महाराज मंडईत मच्छीविक्रेत्यांसह ३०० गाळेधारक आहेत. चार वर्षांपूर्वी मंडईची इमारत धोकादायक झाल्याचे सांगत महापालिकेने गाळेधारकांना नोटिसा बजावल्या. मच्छीविक्रेत्यांनाही क्रॉफर्ड मार्केटमध्ये स्थलांतरित करण्यात आले. आता मंडई पाडून तिथे सरकारी कार्यालयांसाठी १७ मजली इमारत बांधली जाणार आहे. त्यामुळे मासळी विक्रेत्यांना नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये स्थलांतरित करण्याचा घाट प्रशासनाने घातला. त्याविरोधात मच्छीमार संघटनेने आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी आंदोलने केली. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचीही त्यांनी भेट घेतली. 

ठाकरे यांनी सोमवारी प्रवीण परदेशी यांची भेट घेऊन मच्छी मार्केटच्या मुद्द्यावर चर्चा केली. महात्मा फुले मंडईची डागडुजी होईपर्यंत त्याच परिसरात मच्छीविक्रेत्यांना पर्यायी जागा दिली जाईल. त्यानंतर त्याच ठिकाणी त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असे आश्‍वासन आयुक्त परदेशी यांनी दिले असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

‘स्थलांतर करणार नाही’
मच्छीविक्रेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. काहीही झाले तरी मंडईतून स्थलांतरित होऊ नका, अशी सूचना त्यांनी मच्छीमारांना दिली होती. त्यानंतर गेल्या शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी पालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली. कोळीबांधवांचे शहराबाहेर स्थलांतर करू नये, असे निर्देश त्यांनी आयुक्तांना दिले. इमारत धोकादायक असल्याचे ‘टॅग’ समिती स्पष्ट करत नाही तोपर्यंत स्थलांतर करणार नाही, अशी ग्वाही आयुक्तांनी दिल्याची माहिती महापौरांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC will not relocate Mumbai's fishermen to Navi Mumbai