निम्म्या नौका धक्‍क्‍याला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

'नोटकल्लोळा'मुळे कोळीवाड्यातील उत्पन्नात घट
मुंबई - पाचशे व हजारच्या नोटा चलनातून रद्द झाल्याने उद्‌भवलेल्या "नोटकल्लोळा'मुळे मुंबईतील कोळीवाड्यांतील निम्म्या नौका धक्‍क्‍याला लागल्या आहेत. डीझेलसाठी सुटे पैसे नसल्याने मासेमारीसाठी बोट समुद्रात नेता येत नाही. सुटे पैसे जमवून डीझेल मिळवले तरी मासळी विकत घेण्यासाठी ग्राहकांकडे पैसे नाहीत. या परिस्थितीला मच्छरमारांना सामोरे जावे लागत आहे. दोन दिवसांत वरळी कोळीवाड्यातील मासळीचे उत्पन्न 50 टक्के घटले आहे. अन्य कोळीवाड्यांतही असेच चित्र आहे.

वरळी कोळीवाडा नाखवा मत्स्यव्यवसाय सहकारी सोसायटीतून बोटींना दररोज 500 लिटर डीझेल पुरवले जाते. या सोसायटीने चलनातून रद्द झालेल्या नोटा स्वीकारणे थांबवल्याने डीझेलचा खप अवघ्या 150 लिटरवर आला आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष हरिशचंद्र नाखवा यांनी दिली. चलनातून 500, हजारच्या नोटा रद्द झाल्यानंतर मच्छीमारांना पहिल्या दिवशी उधारीवर डीझेल दिले. रोज तसे करणे शक्‍य नाही. त्यामुळे निम्म्या बोटी धक्‍क्‍याला लागल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी वरळी कोळीवाड्यातून रोज तीन-चार लाखांची मासळी विकली जात होती. आता ही उलाढाल दोन लाखांवर आली आहे.

बाजारांकडे ग्राहकांची पाठ
कोळीवाड्यांसारखीच परिस्थिती मुंबईतील मासळी बाजारांची आहे. दिवसभरात 2,300 रुपयांची मासळी उधारीवर दिली, असे घाटकोपरमधील एका मासेविक्रेत्याने सांगितले; तर बाजारातील ग्राहकांचे प्रमाण निम्म्यावर आल्याचे वरळीतील मासेविक्रेते देवानंद वरळीकर यांनी सांगितले. घेतलेला माल लवकर खपवावा लागतो. तो जास्तीत जास्त दोन दिवस बर्फात ठेवता येतो. त्यामुळे ओळखीच्या ग्राहकाला उधारीवर माल देत आहोत, असे अनेक विक्रेत्यांनी सांगितले.

बाजारात मासळी विक्रीत 50 टक्के घट झाली आहे. भाव मिळत नसल्याने विक्रेतेही बाजारात जात नाहीत. त्यामुळे मासळीचे दरही 50 टक्‍क्‍यांनी उतरले आहेत. हा परिणाम स्थानिक बाजारांमध्येच जाणवत आहे. मासे निर्यात करणाऱ्यांवर तो झालेला नाही.
- दामोदर तांडेल, मच्छीमारांचे नेते

Web Title: boat stop by money