पामबीच तलावातील नौकाविहार रखडला

पामबीच तलावातील नौकाविहार रखडला
पामबीच तलावातील नौकाविहार रखडला

नवी मुंबई : शहराचा ‘क्विन नेकलेस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पामबीच रस्त्याच्या शेजारच्या तलावातील नौकाविहार प्रकल्प रखडला आहे. पामबीच रस्त्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या तलावात कारंजे उभारून विविध रंगांचे लाईट शो केले जाणार होते. या सुशोभीकरणानंतर या तलावात नौकाविहार सुरू केला जाणार होता. मात्र तलावात कारंजे व लाईट शोची सामग्री बसवण्याच्या कामाला अद्याप सुरुवात न झाल्यामुळे तलावातील प्रत्यक्ष नौकाविहाराचे काम रखडले आहे.
 
नवी मुंबई शहरात फारशी पर्यटनस्थळे नसल्यामुळे नागरिकांना अनेकदा मुंबई, पुण्याकडे धाव घ्यावी लागते. मुलांना घेऊन मॉल्स अथवा सिनेमागृहांमध्ये घेऊन जावे लागते. खासकरून बच्चे कंपनीसाठी शहरात उद्याने सोडल्यास दुसरी विरंगुळ्याची ठिकाणे नाहीत. पूर्वीपासून शहरात वाशी येथील मिनी सी-शोरच्या परिसरात नौकाविहार सुविधा सुरू आहे. या सुविधेला बच्चे कंपनीसह प्रेमीयुगुलांचाही चांगला प्रतिसाद लाभतो. तत्कालीन आयुक्त आणि लोकप्रतिनिधींच्या अट्टहासामुळे कोपरखैरणे येथील तलावात नौकाविहार सुरू करण्यात आला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे तत्कालीन आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी पामबीच तलावात नौकाविहार सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु त्यापूर्वी या तलावात कारंजे बसवून त्यावर विविध रंगांचा लाईट शो केला जाणार होता. तलावाचे सुशोभीकरणाचे काम झाल्यावर प्रत्यक्ष नौकाविहार मालमत्ता विभागातर्फे सुरू केले जाणार होते. मात्र, अभियांत्रिकी विभागातर्फे सध्या सुशोभीकरण, कारंजे व लाईट शो या विकास कामांबाबत अभ्यास सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. तलावाचे सुशोभीकरण केले नसल्यामुळे मालमत्ता विभागाला तलावात नौकाविहार प्रकल्प राबवता येत नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

पाण्यावर धावणारी बसही गायब
पालिका मुख्यालय ते ज्वेल्स ऑफ नवी मुंबई या उद्यानापर्यंत पाणी व रस्त्यावर धावणारी बस पालिकेतर्फे चालवण्यात येणार होती. जेएनपीटीतर्फे ही बस खरेदी केल्यावर महापालिकेला दिली जाणार होती. मात्र, तलावातील खडकाळ भागामुळे ही बस चालवण्यात असमर्थ असल्याचा अहवाल प्रशासनाला मिळाल्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्यावर धावणाऱ्या बसची सफर स्वप्नवत राहिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com