स्मार्टफोन लेन्सद्वारे ओळखता येणार बनावट नोटा

Smartphone
Smartphone

मुंबई - मुंबई आयआयटीमधील संशोधकांनी विशिष्ट प्रकारच्या लेन्सचा शोध लावला असून रक्तामधील पेशींसह बनावट नोटा स्मार्टफोनद्वारे पाहता येणे शक्‍य होणार आहे. अल्प किमतीत उपलब्ध होणाऱ्या लेन्समुळे संशोधनाला अधिक चालना मिळणार असून मायक्रोस्कोपला पर्यायी तंत्रज्ञान विकसित करण्यात यश आले आहे. एण्डोस्कोपीमध्येही लेन्स वापरता येऊ शकतो. शुक्राणूंची मोजणी, दातांची पाहणी आणि काही शल्यप्रक्रियासुद्धा करता येणार आहेत.

मायक्रोस्कोपमध्ये वापरण्यात येणाऱ्या लेन्स साधारणपणे पॉलिश केलेल्या काचा किंवा मोल्डिंग प्लास्टिकपासून बनवलेल्या असतात. त्या फारच किमती असल्याने त्यापासून बनवण्यात येणारी उपकरणे महागडी असतात. मात्र, आयआयटीमधील संशोधकांच्या संशोधनामुळे महागड्या लेन्स आता फारच स्वस्तात उपलब्ध होणार आहेत. त्यांचा वापर स्मार्टफोनमध्येही करता येणार असल्याने संशोधनाला अधिक गती मिळेल. आयआयटीमधील संशोधकांनी एक विशिष्ट प्रकारच्या द्रव्याचा शोध लावून त्याचा वापर लेन्स बनवण्यासाठी केला आहे.

द्रव्यापासून बनवण्यात आलेली लेन्स हाताळण्यास सोपी आणि स्थिर ठेवणे संशोधकांसाठी आव्हान होते. संशोधकांनी पॉलिडायमेथिलसिलॉक्‍सेन (पीडीएमएस)चा वापर करून बनवलेले द्रव ग्लिसरॉल किंवा पाण्यामध्ये मिसळत नाही. एखाद्या द्रवपदार्थामध्ये ते ओतल्यास पृष्ठभागावर पीडीएमएस चंद्राकृती आकार दिसतो. त्यावर एअरगनच्या माध्यमातून विशिष्ट दबाव आणल्यानंतर ते त्याचा आकार बदलत असल्याने त्यापासून एक उत्तम लेन्स बनवण्यास मदत होत असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. ‘बायोमेडिकल ऑप्टिक्‍स’ जर्नलमध्ये संबंधित संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.

मायक्रोस्कोपमधील लेन्समध्ये व्यवस्थित प्रकाश न आल्यास चित्र स्पष्ट दिसत नसे. त्यामुळे संशोधनात अडथळे येत होते. ते दूर करण्यासाठी आम्ही पर्यायी तंत्रज्ञान विकसित केले, असे मुंबई आयआयटीच्या डॉ. भुवनेश्‍वरी करुणाकरण यांनी सांगितले. विशेष म्हणजे नव्या तंत्रज्ञानामुळे पारंपरिक लेन्सच्या तुलनेत अधिक स्पष्ट, उत्तम व चांगले परिणाम येऊ लागल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com