बेपत्ता अधिकाऱ्याची परवान्यावर बोगस सही!

बेपत्ता अधिकाऱ्याची परवान्यावर बोगस सही!

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या नगररचना विभागातील धक्कादायक प्रताप पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. गेल्या सव्वातीन वर्षांपासून बेपत्ता असणाऱ्या नगररचनाकार संजीव करपे यांची चक्क 9 सप्टेंबर 2019 रोजी एका बांधकाम परवान्यावर बोगस सही केल्याचे आढळून आल्याने महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख स्वतः चक्रावले आहेत.

नगररचनाकार संजीव करपे हे 21 ऑगस्ट 2016 पासून बेपत्ता असूनही गत महिन्याच्या 9 तारखेला पालिकेकडून देण्यात आलेल्या बांधकाम परवान्यावर करपे यांची बोगस सही असल्याचे आढळून आल्याने नगररचना विभागातील काही मंडळींचे पितळ उघडे पडण्याची शक्‍यता आहे.

6 जून 2016 रोजी कॅम्प नंबर 5 मधील दोघा इसमांनी उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 मध्ये असलेल्या ब्लॉक क्रमांक सी - 807, रूम नंबर - 1614, सीटी सर्वे क्रमांक 25925 या बांधकामाच्या प्लॅनची फाईल मंजुरीसाठी नगररचना विभागात सादर केली होती. त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या शुल्काची रक्‍कमदेखील भरली होती; परंतु प्लॅनमध्ये काही त्रुटी निदर्शनास आल्याने संजीव करपे यांनी बांधकाम परवान्याची फाईल नामंजूर करून त्यावर सही केली नव्हती. याच काळात संजीव करपे यांनी बेकायदा प्लॅन मंजूर करून प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केल्याची तक्रार आमदार ज्योती कलानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीदेखील केली होती. त्यानंतर संजीव करपे हे कारने पुण्याला जात असतानाच, त्यांनी खोपोलीजवळ कार थांबवली आणि ड्रायव्हरकडे बॅग, मोबाईल, पाकीट सोपवून मला माझा मित्र त्याच्या कारमधून सोडणार असल्याचे सांगून त्याला घरी जाण्यास सांगितले.

तेव्हापासून संजीव करपे बेपत्ता आहेत. असे असताना 9 सप्टेंबर 2019 च्या बांधकाम परवान्यावर करपे यांची बोगस सही करण्याचा प्रताप समोर आल्याने नगररचना विभागात खळबळ उडाली आहे. यावर कुछ तो गडबड है, अशी प्रतिक्रिया मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांनी दिली आहे. 


उल्हासनगरात खरेच काहीही होऊ शकते. निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कागदपत्रांची, सहीची शहानिशा करून निर्णय घेण्यात येईल. 
- सुधाकर देशमुख, आयुक्त, उल्हासनगर 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com