बोगस मतदारांची नावे वगळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

मुंबई - ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या अनेक शाळा मुंबई शिक्षक मतदारसंघात आहेत. या शाळांतून निवृत्त झालेले शिक्षक आणि शिक्षक नसणाऱ्या व्यक्तींचीही नावे मतदार यादीत घुसविण्यात आली आहेत, असा आरोप शिक्षक भारती संघटनेने केला आहे. या संस्थेची तपासणी करून बोगस मतदारांची नावे यादीतून वगळावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत उतेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे नोंद असलेला ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचा मंजूर स्टाफ आणि कार्यरत शिक्षकांची यादी तपासण्यात यावी, अशी मागणी उतेकर यांनी केली आहे. या तपासणीतून बोगस मतदारांची नोंदणी उघड होईल, असा दावाही त्यांनी केला आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात मुंबईबाहेर राहणाऱ्या शिक्षकांचीही नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या संस्थांची तपासणी करावी, अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या यादीमध्ये 150 बोगस मतदारांचा समावेश असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: bogus voter name remove