एन. डी. स्टुडिओत बॉलीवूड पर्यटन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

मुंबई - ‘एनडीज्‌ फिल्म वर्ल्ड’मध्ये प्रवेश केल्यावर तुमचे गब्बर सिंगने शोले स्टाईल स्वागत केले तर कसे वाटेल...? कर्जतच्या एन. डी. स्टुडिओच्या आवारात पाऊल टाकल्यापासून अवघे बॉलीवूड अवरतल्याचा भास होतो. कारण जागोजागी अनेक सिनेमांतील विविध व्यक्तिरेखा... अगदी मुमताजपासून चुलबुल पांडेपर्यंत त्यांच्या गेटअपमध्ये भेटतात. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि एनडीज्‌ फिल्म वर्ल्ड यांनी एकत्र येत भव्यदिव्य अशा फिल्मी दुनियेची सफर पर्यटकांना घडवण्याचा निर्धार केलाय. त्यानिमित्त चार दिवसांचे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

मुंबई - ‘एनडीज्‌ फिल्म वर्ल्ड’मध्ये प्रवेश केल्यावर तुमचे गब्बर सिंगने शोले स्टाईल स्वागत केले तर कसे वाटेल...? कर्जतच्या एन. डी. स्टुडिओच्या आवारात पाऊल टाकल्यापासून अवघे बॉलीवूड अवरतल्याचा भास होतो. कारण जागोजागी अनेक सिनेमांतील विविध व्यक्तिरेखा... अगदी मुमताजपासून चुलबुल पांडेपर्यंत त्यांच्या गेटअपमध्ये भेटतात. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि एनडीज्‌ फिल्म वर्ल्ड यांनी एकत्र येत भव्यदिव्य अशा फिल्मी दुनियेची सफर पर्यटकांना घडवण्याचा निर्धार केलाय. त्यानिमित्त चार दिवसांचे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. २८ एप्रिलपासून प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक अवधूत गुप्ते यांच्या संगीत मैफिलीने त्याची झोकात सुरुवात झाली.

एनडीज्‌ फिल्म वर्ल्डमध्ये २८ एप्रिल ते १ मेपर्यंत विविध कार्यक्रम रंगणार आहेत. महोत्सवाचे उद्‌घाटन प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते झाले. अभिनेता चिन्मय मांडलेकर, अभिनेत्री मानसी नाईक, कांचन अधिकारी, एनडी स्टुडिओचे सर्वेसर्वा नितीन देसाई, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक स्वाती काळे आदी मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाची सुरुवात अवधूत गुप्ते यांच्या सादरीकरणाने झाली. आपल्या अल्बममधील काही लोकप्रिय गाण्यांबरोबर त्यांनी मधुबाला, ‘झेंडा’ आणि ‘एक तारा’ सिनेमातील गीते सादर करीत प्रेक्षकांना स्वतःसोबत डोलायला लावले. मानसी नाईक आणि एनडी स्टुडिओतील काही कलाकारांनी एकापेक्षा एक नृत्याविष्कार सादर करत सर्वांनाच खिळवून ठेवले. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मानसी नाईकने २८ वेगवेगळ्या गेटअपमध्ये केलेल्या एका व्हिडीओचा प्रोमो दाखवण्यात आला. नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, की गुणी कलाकारांना आजपासून आपले टॅलेंट सादर करण्यासाठी आम्ही एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. तो वर्षभर अशा कलाकारांसाठी खुला असेल, असेही त्यांनी नमूद केले. राज्यातील कला आणि संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी एनडी स्टुडिओत महोत्सव होणार असून ‘जिलो अपनी फिल्मी ख्वाईशें’ अशी महोत्सवाची थीम आहे. म्हणून हॉलीवूडच्या धर्तीवर इथे बॉलीवूड थीम पार्क साकारण्यात आले आहे. त्यात ‘प्रेम रतन धन पायो’, ‘जोधा अकबर’ आदी काही बॉलीवूडपटांचे सेट आपल्याला पाहायला मिळतात. गावाचा सेट, टाईम स्क्वेअर, फॅशन स्ट्रीट, चोर बाजार इत्यादी काही प्रसिद्ध ठिकाणांचे हुबेहूब सेटही आकर्षण आहेत. बॉलीवूडपटांनी सजलेली मोठीच्या मोठी भिंत स्टुडिओत साकारण्यात आली आहे. त्यामुळे सोहळ्याच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीला बॉलीवूड पर्यटनाचा जणू काही प्रीमियर सुरू झाल्यासारखे वातावरण होते.

तळागाळातील कलाकारांसाठीच
एन. डी. स्टुडिओ उभारल्यानंतर कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे स्वप्न होते. बॉलीवूड पर्यटनाला चालना मिळण्यासाठी हॉलीवूडच्या धर्तीवर थीम पार्क उभारण्याची इच्छा होती. माझी कल्पना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे बोलून दाखवली आणि त्यांनीही पाठिंबा दिला. यापुढेही बॉलीवूड पर्यटनाकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तळागाळातील कुठल्याही कलाकारासाठी एन. डी. स्टुडिओतील मंच कला सादर करण्यासाठी नेहमीच उपलब्ध असेल, असे एन. डी. स्टुडिओचे मालक नितीन देसाई यांनी सांगितले.

Web Title: Bollywood Tourism at the N. D. Studio