मंगळवारी खबर; सूत्रधार दुसराच?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मुंबई - राज्यातील काही भागांत घातपात घडवला जाण्याची शक्‍यता असल्याची माहिती मंगळवारी (ता. 7) एटीएसला मिळाली होती. पाच मोबाईल क्रमांकांचा माग काढून पोलिस वैभव राऊतपर्यंत पोहोचल्यावर हा कट उलगडला. मात्र, अटक केलेले तिघेही नवखे असून यामागे दुसराच सूत्रधार असण्याची शक्‍यता आहे.

मुंबई - राज्यातील काही भागांत घातपात घडवला जाण्याची शक्‍यता असल्याची माहिती मंगळवारी (ता. 7) एटीएसला मिळाली होती. पाच मोबाईल क्रमांकांचा माग काढून पोलिस वैभव राऊतपर्यंत पोहोचल्यावर हा कट उलगडला. मात्र, अटक केलेले तिघेही नवखे असून यामागे दुसराच सूत्रधार असण्याची शक्‍यता आहे.

या प्रकरणी पोलिसांनी राज्यभरातून 15 ते 16 जणांना ताब्यात घेतले आहे. मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारा येथे घातपाती कारवाई होण्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुरुवारी वैभव राऊत यांची चौकशी सुरू केल्यानंतर कारवाईचे धागे उलगडत गेले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. वैभवच्या कथित हिंदुत्ववादी वृत्तीमुळे नालासोपारा परिसरात कायम तणावाचे वातावरण राहायचे. त्या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवू नये, यासाठी जिल्हाधिकारी व नालासोपारा पोलिसांकडून वैभवला यापूर्वी सीआरपीसी 144 नुसार अनेकदा नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या.

हिंदू राष्ट्राची प्रतीक्षा
वैभव राऊत याने 17 मे 2017 रोजी एक ट्विट केले आहे. त्यात सनातन प्रभातचे जयंत आठवले यांना उल्लेखून "साधना करनेसेही हिंदू राष्ट्र जल्दी आरंभ होगा' असे नमूद आहे. काही ट्विटमध्ये त्याने जयंत आठवले यांचा उल्लेख "जय गुरुदेव' असा केला आहे. वैभव हा सनातनचा साधक नाही; पण तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. त्याच्या घरी स्फोटके सापडणे शक्‍य नाही. पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. गृहमंत्री वारंवार "सनातन' संस्थेला बदनाम करत आहेत. वैभवला शक्‍य ती सर्व मदत करू, अशी प्रतिक्रिया "सनातन' संस्थेचे वकील पुनाळेकर यांनी दिली. मालेगाव स्फोटात पकडलेले कार्यकर्तेही निर्दोष निघाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

शरदला भाड्याचे घर
नालासोपाराच्या भंडाराआळी परिसरातील तीन मजल्यांच्या इमारतीत वैभव दुसऱ्या मजल्यावर राहत होता. पहिल्या मजल्यावर तो नागरिकांना हिंदुत्वाबद्दल मार्गदर्शन करायचा. वैभवच्या ओळखीवरच शरदला नालासोपाऱ्यात पंडित विजय जोशी यांच्या घरात भाड्यावर ठेवण्यात आले होते. जोशी हे ज्योतिषी आहेत. कुंडली आणि हात पाहण्यासाठी ते फक्त त्या खोलीत जायचे. गुरुवारी सकाळी जोशी हे त्याच्या खोलीवर गेले असता, त्यांना खोलीच्या ताळ्यावर सील लावलेले दिसले. पोलिसांनी शरदला पकडून नेल्याचे शेजाऱ्यांनी जोशींना सांगितले.

गोंधळेकर "शिवप्रतिष्ठान'चे
सातारा येथे 2016 मध्ये "सनातन' संस्थेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या वेळी "सनातन'चे प्रवक्ते अभय वर्तक यांच्यासह सुधन्वा गोंधळेकर उपस्थित होते, असे वृत्त सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर छायाचित्रासह प्रसिद्ध केले आहे. त्यात गोंधळेकर हा शिवप्रतिष्ठानचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित होता.

Web Title: bomb blast terrorist attack crime police alert