Mumbai Police : ट्विटरद्वारे मुंबईत घातपाताची मुंबई पोलिसाना धमकी.. नांदेडमधून एकाला अटक... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Police

Mumbai Police : ट्विटरद्वारे मुंबईत घातपाताची मुंबई पोलिसाना धमकी.. नांदेडमधून एकाला अटक...

मुंबई - बॉम्बस्फोटाच्या धमकीची काही प्रकरणं सातत्याने समोर येत आहेत. याच पार्श्भूमीवर सोमवारी मुंबई पोलिसांच्या ट्वीटर हँडलला टॅग करत धमकी देण्यात आली आहे. पोस्टमध्ये धमकी देणाऱ्याने “मी लवकरच मुंबईत स्फोट घडवणार आहे” असं लिहिलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ तपास सुरु केला.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातून एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. ही पोस्ट 22 मे रोजी सकाळी 11 च्या सुमारास करण्यात आल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया टीमने ही पोस्ट पाहताच संबंधित पोलिस ठाण्याला याविषयी माहिती दिली. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरु करण्यात आला.

रविवारीही अशाच प्रकारचा एक फोन आला होता. ज्यामध्ये बोलणाऱ्या अज्ञात इसमाने आपण राजस्थानवरुन बोलत असल्याचं सांगितलं होतं आणि 26/11 चा दहशतवादी हल्ला असा उल्लेख करत फोन कट केला होता. त्या कॉलरचाही शोध सुरु आहे. त्यात आता ट्वीटवरुन ही धमकी देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री मुंबई पोलीस कंट्रोल रुममध्ये एक फोन आला. त्याने 26/11 चा उल्लेख करत फोन कट केला. यााधीही एक फोन आला होता त्यावेळी त्या माणसाने कुर्ला पश्चिम भागात स्फोट होईल असं सांगितलं होतं. त्यानंतर रविवारी फोन आला, त्या माणसाने आपण राजस्थानमधून बोलत असल्याचं सांगितलं तसंच 26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख केला आणि फोन कट केला. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे.