प्रेयसीला भेटायला गेला अन् चोर समजून बेदम मार खाल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

विरार पूर्व फुलपाडा परिसरात रविवारी रात्री अकरा ते सव्वाअकराच्या वेळी इमारतीच्या पाठिमागून दारुच्या नशेत चौथ्या मजल्यावर चढणाऱ्या तरुणाला चोर समजुन दोनशे ते तीनशे संतप्त रहिवाशांनी पकडून बेदम चोप दिला.

नालासोपारा : विरार पूर्व फुलपाडा परिसरात रविवारी रात्री अकरा ते सव्वाअकराच्या वेळी इमारतीच्या पाठिमागून दारुच्या नशेत चौथ्या मजल्यावर चढणाऱ्या तरुणाला चोर समजुन दोनशे ते तीनशे संतप्त रहिवाशांनी पकडून बेदम चोप दिला असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत विरार पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. 

विरार पूर्व फुलपाडा जिल्हा परिषदेच्या पाठिमागील डोंगरी परिसरातील एका इमारतीवर अज्ञात तरुण इमारतीच्या पाठीमागील पाईपावरुन चढत असताना लोकांना दिसला होता. तात्काळ चोर चोर असा आरडाओरडा झाल्यानंतर दारुच्या नशेत बेधुंद असणारा तरुणही परिसरातील चार ते पाच इमारतीच्या टेरेसवर उड्या मारुन सैरावरा पळत सुटला होता. शेवटी लोकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. त्याची चौकशी केली असता तो चोर नसून दारुच्या नशेत आपल्या प्रियेसीला भेटण्यासाठी आला असल्याचे समोर आल्यानंतर लोकांनी त्याला सोडूनही दिले. पण मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या घटनेला वाचा फुटली आहे. याबाबत विरार पोलिसात मात्र कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

विरार परिसरात गुन्हेगाराला पकडून बेदम चोप दिल्याच्या घटना आता वाढत आहेत. मागच्या दिड महिन्यात पाच घटना अशा घडल्या आहेत. विरार पूर्व रायपाडा येथे शनिवारी मायलेकींनीच दांड्याने माथेफिरुला चोप दिला, रविवारी फ़ुलपाड्यात चोर समजुन संतप्त जमावाने तरुणाला बेदम मारले, काल विरार पुर्व विवा जहांगिड परिसरात भर रस्त्यात एका तरुणाला बेदम मारले. 25 जूनला संतप्त जमावाने विरार पूर्व डिमार्ट जवळ चोर समजुन एका तरुणाला मारले, 13 जुलैला विरार पश्चिमेकडील अर्नाळा पोलिस ठाण्यात एका वासनांधाला संतप्त महिलांनी बेदम चोप देत त्याची नग्न धिंड काडली. अशा अनेक घटना आता वाढल्या असुन गुन्हेगाराला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी आता नागरिकच कायदा हातात घेत आहेत. या घटनांनमुळे लोकांचा पोलिसांवरिल विश्वास संपला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a boy beaten by people who went to meet his girlfriend