'इस्रो'त नोकरी मिळवून त्यानं धुणीभांडी करणाऱ्या मातेचं स्वप्न केलं पूर्ण..

जीवन तांबे
Wednesday, 6 November 2019

आईने घरकाम करून आम्हाला शिकविले. खूप कष्ट घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र अभ्यास करून इथपर्यंत पोहोचलो, याचा मला खूप आनंद आहे. अशीच मेहनत प्रत्येकाने घेऊन जिद्दीने अभ्यास केला, तर यशोशिखर दूर नाही. - राहुल घोडके

मुंबई : जन्मापासून गरिबीचे चटके सोसत असताना आयुष्यात उच्च पदावर जाण्याच्या जिद्दीने निव्वळ मेहनतीच्या जोरावर चेंबूरमधील तरुणाने अहमदाबादमधील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) केंद्रापर्यंत झेप घेतली आहे. तिथे तो सध्या तंत्रज्ञ म्हणून काम करत आहे. राहुल घोडके असे त्याचे नाव असून आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी चार घरची धुणीभांडी करून झटणाऱ्या मातेचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने त्याने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 

चेंबूरमधील मारवली चर्च परिसरातील नालंदा नगरात एका झोपडपट्टीत दहा बाय दहाच्या घरात राहुल राहतो. त्याने आपले शिक्षण चेंबूरमधील जवाहर विद्यालयात पूर्ण केले. दहावी परीक्षा उत्तीर्ण झाला; पण त्याच वर्षी मजुरीचे काम करणाऱ्या वडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या आईवर आली. तिनेही खंबीर होत उदरनिर्वाहासाठी परिसरातील इमारतींत धुणीभांडी व कॅटरर्सचे काम सुरू केले.

आईने घरकाम करून आम्हाला शिकविले. खूप कष्ट घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र अभ्यास करून इथपर्यंत पोहोचलो, याचा मला खूप आनंद आहे. अशीच मेहनत प्रत्येकाने घेऊन जिद्दीने अभ्यास केला, तर यशोशिखर दूर नाही. - राहुल घोडके

मोठी मुलगी दर्शनासुद्धा शिक्षण घेत होती. दिवस-रात्र झटणाऱ्या आईची फरपट पाहून राहुलने आपले शिक्षण थांबवून बहिणीच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. स्वतःही कामाला जाऊ लागला. आईला व बहिणीच्या शिक्षणाकरिता मदत करीत होता; परंतु दोन वर्षांपासून तो पुस्तके आणि अभ्यासाशिवाय वावरत होता. त्याच्या मनाने मात्र शिक्षणाची ओढ सोडली नव्हती. शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आहे. ते प्यायल्यास कोणतीही व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगी बाणलेल्या राहुलने शिकायचा निर्धार केला.

Image may contain: 2 people, people smiling

गोवंडी आयटीआय कार्यालयात जाऊन दहावीमध्ये मिळालेल्या प्रथम क्रमांकाच्या जोरावर 2012 मध्ये इलेक्‍ट्रॉनिक्‍स अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. खूप मेहनत घेऊन त्याने त्या ट्रेंडमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्यांतर माटुंग्यातील व्हीजेटीआयमध्ये इलेक्‍ट्रॉनिक्‍स डिप्लोमाला दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला. त्यातही प्रथम श्रेणी प्राप्त केली. व्हीजेटीआय महाविद्यालयात शिकत असताना त्याला एका कंपनीत नोकरीची संधी चालून आली. तिथे सर्व्हिस इंजिनिअर म्हणून काम करीत असताना "इस्रो'मध्ये भरती होण्याची इच्छा मनाशी ठेवून तो परीक्षेच्या तयारीला लागला. काही दिवसांतच परीक्षा दिली. देशभरातील विविध राज्यांतील एकूण 15 हजारपेक्षा अधिक मुलांनी अर्ज दाखल करून परीक्षा दिली होती. त्यात राहुल मागासवर्गीय गटातून तिसरा आला. खुल्या गटात त्याने 16 वा क्रमांक पटकावला. सध्या "इस्रो'च्या अहमदाबादमधील केंद्रात त्याची तंत्रज्ञ म्हणून नियुक्ती झाली आहे. 

राहुलच्या यशाने त्याची आई शारदा आणि बहीण दर्शना यांनी आनंद व्यक्त केला. "घरोघरी धुणीभांडी करून राहुलला शिकवले. त्यानेही त्याची उचित परतफेड केली. त्याची इस्रोमध्ये निवड झाल्याबद्दल मला अभिमान आहे,' अशी प्रतिक्रिया त्याच्या आईने दिली. 

Webtitle : boy from chembur gets job in isro


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy from very poor family of mumbai gets job in isro