चाकूच्या धाकाने लोकलमध्ये महिलांना लुटले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

माहीम ते वांद्रेदरम्यान लोकल प्रवासात मंगळवारी (ता. 5) सकाळच्या सुमारास चार अल्पवयीन मुलांनी काही महिलांना चाकूचा धाक दाखवत लुटल्याचा प्रकार घडला.

मुंबई : माहीम ते वांद्रेदरम्यान लोकल प्रवासात मंगळवारी (ता. 5) सकाळच्या सुमारास चार अल्पवयीन मुलांनी काही महिलांना चाकूचा धाक दाखवत लुटल्याचा प्रकार घडला.

या प्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. माहीम येथे महिलांच्या डब्यात काही अल्पवयीन मुले चढली. लोकल माहीम-वांद्रे स्थानकांदरम्यान पोहोचताच या मुलांनी चाकूच्या धाकाने डब्यातील महिलांजवळील पर्स हुसकावून घेतल्या.

महिलांनी आरडाओरड केल्यावर सकाळच्या वेळी गर्दी कमी असल्याने वांद्रे स्थानकात पोहोचण्यापूर्वी ही लोकल थांबली. त्याचा गैरफायदा घेऊन ही मुले पळून गेली. या प्रकरणी संबंधित महिलांनी वांद्रे रेल्वे पोलिसठाण्यात तक्रार दाखल केली आहे, अशी
 माहिती एक युजरने ट्विटरवरून दिली आहे. 

काही दिवसांपूर्वीच मुलांची टोळी अटकेत 

वडाळा रेल्वे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अशीच टोळी पकडली होती. या टोळीतही अल्पवयीन मुलांचा समावेश होता. ब्लेडच्या धाकाने ही टोळी प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न करत होती. नशेसाठी ही मुले लुटमार करायची, असे तपासात उघड झाले आहे. रेल्वे पोलिसांनी याबाबत वेगाने तपास करणार असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boys robbed women in local with Knife