माथेरानच्या विकासाला ब्रेक?

 माथेरान : ट्रॅक्‍टरमधून वाहतूक करताना.
माथेरान : ट्रॅक्‍टरमधून वाहतूक करताना.

माथेरान (बातमीदार) ः माथेरानमध्ये एमएमआरडीए अंतर्गत विविध पर्यटनस्थळी विकासात्मक कामे सुरू आहेत; परंतु मनुष्यबळ लावून येथे वेळेत काम करणे शक्‍य नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने ट्रॅक्‍टरची व्यवस्था केली होती. मात्र येथील भाजप तालुकाध्यक्ष, बेलदार समाज, तसेच मुळवासीय अश्‍वपाल संघटनेने विरोध केल्यामुळे ट्रॅक्‍टरमधून मालवाहतूक करण्यास ब्रेक लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
 एमएमआरडीएने दस्तुरी ते चार व्ह्यू पॉईंटचे सौंदर्यीकरण व दुरुस्तीकरीता लागणारे साहित्य जसे दगड, पेव्हर ब्लॉक, व्ह्यूम पाईप नेण्यासाठी ट्रॅक्‍टरची परवानगी मागितली होती. येथे वाहनबंदी असून फक्त रुग्णवाहिका व अग्निशमन बंब यांनाच प्रवेश देण्यात आला आहे. मात्र येथील भौगोलिक परिस्थिती पाहता ही विकासकामे चांगली होण्यासाठी ट्रॅक्‍टर महत्त्वाचा असल्यामुळे फक्त ४५ दिवसांची परवानगी एमएमआरडीएला देण्यात आली होती. त्यानुसार संबंधित ठेकेदाराने ट्रॅक्‍टर लावून काम सुरू केले होते. त्यातून दगड वाहून नेण्याचे काम चालू होते. असे असताना दस्तुरी येथील मालवाहू घोडेवाले बेलदार समाज आणि दस्तुरी येथीलच प्रवासी घोडेवाल्यांची मुळवासीय अश्‍वपाल संघटना व भाजपच्या तालुका शहराध्यक्षा बबिता शेळके यांनी विरोध केला. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी ठेकेदाराकडे परवानगी आहे, तुम्ही तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करा, असे सांगितले. 
त्याच वेळेस ठेकेदाराने पुढील आदेश मिळेपर्यंत ट्रॅक्‍टरमधून वाहतूक बंद केली आहे. अशा कुरघोड्यांमुळे माथेरानचा विकास खुंटणार ही भीती येथील स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, माथेरानमधील मुळवासीय अश्‍वपाल संघटना, मालवाहू बेलदार समाज व भाजप महिला तालुका अध्यक्ष बबिता शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ट्रॅक्‍टरला विरोध नसून ज्याप्रमाणे कंत्राटदाराला ट्रॅक्‍टरची परवानगी देऊन माथेरान शहरात पाठवत आहात. त्याप्रमाणे जीवनावश्‍यक वस्तू नेण्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांनाही ट्रॅक्‍टरची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

अधिसूचनेचा उल्लेख नाही
४ फेब्रुवारी २००३ मध्ये केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने अधिसूचना काढली होती. त्यात रुग्णवाहिका व अग्निशमन बंब तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी ट्रॅक्‍टरची तरतूद केली होती. मात्र १६ जानेवारी २००४ च्या अधिसूचनेत फक्त एक रुग्णवाहिका व अग्निशमन बंब शहरात व एक रुग्णवाहिका आणि अग्निशमन बंब हे राखीव ठेवले. तसेच ट्रॅक्‍टरला यांच्यातून वगळण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगी पत्रात २००३ च्या अधिसूचनेचा उल्लेख केला आहे, पण १६ जानेवारी २००४ ला काढलेल्या अधिसूचनेचा परवानगी पत्रात कोणताही उल्लेख नाही.

एमएमआरडीएने माथेरानच्या विकासकामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी आणली ही स्वागतार्ह बाब आहे. ही विकासकामे होणे ही काळाची गरज आहे, पण जसे दगड वाहून नेण्यासाठी ट्रॅक्‍टरला तात्पुरती परवानगी दिली आहे, तसेच येथील जीवनावश्‍यक वस्तू या माथेरान शहरात नेण्याकरिता ही परवानगी मिळावी. 
- राजेश चौधरी, अध्यक्ष, माथेरान व्यापारी फेडरेशन

माथेरानमधील अंतर्गत रस्ता व चार प्रेक्षणीय पॉईंट यांची विकासकामे एमएमआरडीएअंतर्गत सुरू आहेत. ही विकासकामे करण्यासाठी ट्रॅक्‍टरची परवानगी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे ४५ दिवसच ही परवानगी दिली आहे. त्यामुळे आमच्या संघटनेचा याला कोणताही विरोध नाही. फक्त ४५ दिवसांपर्यंतच ही मुदत द्यावी, त्यानंतर ट्रॅक्‍टर सेवा बंद करावी.
- आशा कदम, अध्यक्षा स्थानिक अश्‍वपाल संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com