पूल मुंबईमध्ये कोसळला, दुरुस्तीचे काम बदलापूरमध्ये सुरू

गिरीश वसंत त्रिवेदी
मंगळवार, 19 मार्च 2019

अंधेरी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेने अनेक पुलांची देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले. याची सुरवात बदलापूर पासून करण्यात आली होती. 

बदलापूर : मुंबई मध्ये रेल्वेचा पादचारी पूल कोसळला की, बदलापूरमधील रेल्वेच्या पादचारी पुलाच्या डागडुजीचे काम सुरु होते असा अनुभव बदलापूरच्या नागरिकांना येत आहे. रेल्वे प्रशासन बदलापूरच्या प्रवाशांचंकडे तेव्हाच लक्ष देईल. ज्यावेळी मुंबई मध्ये एखादी दुर्घटना घडेल. अन्यथा लक्ष देणार नाही का असा सवाल प्रवासी विचारत आहेत. 

गेल्या वर्षी अंधेरीचा पूल कोसळला त्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक, दोन व तीन ला जोडणारा, मधोमध असलेल्या अतिशय जुन्या पादचारी पुलाच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले होते. अंधेरी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेने अनेक पुलांची देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले. याची सुरवात बदलापूर पासून करण्यात आली होती.  

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जवळील हिमालय पूल कोसळल्यावर बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला कर्जतच्या दिशेला मच्छी मार्केट येथे उतरणाऱ्या पादचारी पुलाची डागडुजीचे काम सुरु करण्यात आले आहे. या पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे यासाठी भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी गेल्या वर्षी थेट रेल्वेच्या विभागीय महाव्यवस्थापकांना निवेदन दिले होते. स्थानिक नगरसेविका रुचिता घोरपडे यांनी काही दिवसांपूर्वी स्टेशन प्रबंधकांना महिला प्रवाशांसोबत प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते. मात्र हिमालय पूल कोसळल्यावर रेल्वे प्रशासनाने या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. नागरिकांना पूर्व व पश्चिमकडे येण्या जाण्यासाठी सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल प्रशस्त आहे. मात्र ऊन पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी या पुलावर छताची सुविधाच नाही. परिणामी पादचाऱ्यांना ऊन पावसात जावे लागते, त्याचप्रमाणे ऊन पावसात या पुलाची प्रचंड प्रमाणात झीज देखील होत आहे. दुरुस्ती करताना जुन्या पूला प्रमाणेच याही पुलावरील जुन्या लाद्या काढून नवीन लाद्या बसविण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी भेगा स्पष्टपणे दिसत आहेत.

 

Web Title: The bridge collapsed in Mumbai work continuing in Badlapur