पूल बांधणीचा तिढा सुटता सुटेना ; रेल्वे, मनपा हद्दीचा वाद कायम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

बैठकीत पूल बांधणीचा कोणताही निर्णय झाला नाही. पुलावरील अतिरिक्त भार तात्काळ काढण्याची सूचना पालिकेला करण्यात आली. 
- रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्‍चिम रेल्वे. 

मुंबई : अंधेरी येथील गोखले पूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच रेल्वे आणि महानगर पालिकेतील हद्दीचा वाद संपलेला नाही. रेल्वे आणि पालिका प्रशासन लोअर परळ येथील धोकादायक पूल बांधण्याची जबाबदारीच स्वीकारत नाही. 
लोअर परळ येथील पुलाच्या बांधकामासाठी शनिवारी पश्‍चिम रेल्वे मुख्यालयात पालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत रेल्वे आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पूल बांधण्याची जबाबदारी झटकली आहे. 

रेल्वेच्या हद्दीतील पूल रेल्वेने बांधावा, उतर भागातील पूल आम्ही बांधू, अशी भूमिका पालिकेने कायम ठेवली आहे; तर आम्ही पूल पाडून देऊ, नवा पूल तुम्हीच बांधा, असे रेल्वेचे म्हणणे आहे. अंधेरीतील गोखले पुलाची मार्गिका कोसळल्यानंतरही रेल्वे आणि पालिकेने एकमेकांकडे बोट दाखविण्यास सुरुवात केली होती. त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. 

पुलाच्या बांधकामावरून दोन्ही प्रशासनाचे एकमत झालेले नसताना पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेने पुलावरील जलवाहिन्या आणि इतर वाहिन्या हटवाव्यात. त्यानंतर रेल्वे निविदा काढून हा धोकादायक पूल पाडेल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. 

"एमआरव्हीसी'वर जबाबदारी 

मुंबई महानगराच्या परिसरातील रेल्वेचा विकास करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली आहे. पश्‍चिम रेल्वे आणि पालिकेने पूल बांधण्याची जबाबदारी नाकारल्यास एमआरव्हीसीवर ही जबाबदारी सोपवली जाण्याची शक्‍यता आहे. 
 

Web Title: bridge issue of Lower parel