ठाण्याच भावानेच केली भावाची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

जेवणावरून आईशी भांडण करणाऱ्या लहान भावाला समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोठ्या भावावर चाकूने वार करून हत्या केल्याची घटना कळव्यात घडली आहे.

ठाणे : जेवणावरून आईशी भांडण करणाऱ्या लहान भावाला समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोठ्या भावावर चाकूने वार करून हत्या केल्याची घटना कळव्यातील मातोश्री जानकीनगरमध्ये सोमवारी दुपारी घडली. नितीन घोगळे (40) असे मृत भावाचे नाव आहे. 

याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अजय घोगळे (38) या आरोपी भावाला अटक करण्यात आली आहे. मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील रहिवासी असलेले नितीन घोगळे आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि भाऊ अजय यांच्यासह कळवा येथील मनीषानगर, जानकीनगरमधील सहा नंबरच्या चाळीत राहत होते. नितीन यांचा लहान भाऊ अजय हा क्‍लबमध्ये अधूनमधून कामाला जात असून सोमवारी घोगळे कुटुंबीय घरीच होते.

दिवाळी सण असल्याने आईने दुपारी 12:30 वाजता अजयला जेवण वाढले. जेवण केल्यानंतर तो आईशी भांडण करू लागला. तसेच शिवीगाळही करू लागल्याने नितीनने लहान भावाला समजवण्याचा प्रयत्न केला. 
मात्र, अजय हुज्जत घालू लागल्याने नितीनने त्याला हाताने एक चापट मारली. याचा राग आल्याने अजयने चाकूने नितीन यांच्यावर वार केले. यामध्ये छातीवर गंभीर जखम झाल्याने नितीन दारातच कोसळला.

भांडणाचा आरडाओरडा ऐकून आसपासचे लोक जमा झाले आणि त्यांनी नितीन यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्‍टरांनी तपासून नितीन यांना मृत घोषित केले. नितीन यांच्या पत्नी सुरेखा (36) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक के. एस. बघडाणे अधिक तपास करत आहेत. 

web title : Brother killed his own brother


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brother killed his own brother