कळंब परिसरात बीएसएनएल "नॉट रिचेबल'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

कर्जत तालुक्‍यातील कळंब परिसरात मागील आठ-नऊ महिन्यांपासून काही भागात बीएसएनएलची सेवा खंडित झाली असून मोबाईल, लॅंडलाईन सेवा खंडित झाली आहे.

कर्जत : "कनेक्‍टिंग इंडिया' हे ब्रीद मिरवणाऱ्या खेड्या-पाड्यांना जोडून 'हिंदोस्ता बोल रहा है' म्हणणारे बीएसएनएलची सेवा ग्रामीण भागात पूर्णपणे खंडित झाल्याचे चित्र दिसत आहे. कर्जत तालुक्‍यातील कळंब परिसरात मागील आठ-नऊ महिन्यांपासून काही भागात बीएसएनएलची सेवा खंडित झाली असून मोबाईल, लॅंडलाईन सेवा खंडित झाली आहे. त्यामुळे या भागातील बीएसएनएलच्या ग्राहकांची गैरसोय होत आहे. 

शहरापासून अगदी गाव-खेड्यापर्यंत जाळे पसरलेल्या बीएसएनएल कंपनीची ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सेवा पूर्णपणे बंद आहे. कळंब परिसरात बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून खंडित सेवेमुळे त्यांची गैरसोय होत आहे. कळंब येथे उभारलेल्या बीएसएनएलचा मोबाईल टॉवर बंद असून मोबाईल, इंटरनेट सेवाही पूर्णपणे बंद आहे.

विशेष म्हणजे येथील कार्यालयात कोणीही कर्मचारी वा अधिकारी फिरकत नाही, वर्षभरापासून कार्यालय उघडले गेले नसल्याचे येथील स्थानिक ग्राहकांचे म्हणणे आहे. खेदाची बाब म्हणजे या संदर्भात नेरळ, कर्जत येथील कार्यालयात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठीच बीएसएनएलकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील ग्राहक करत आहेत. 

कळंब भागात बीएसएनएलची सेवा आठ-नऊ महिन्यांपासून पूर्णपणे खंडित आहे. मोबाईल, लॅंडलाईनही बंद करण्यात आले आहेत. तसेच कळंब येथील कार्यालय बंद असून कोणीही कर्मचारी इकडे फिरकतदेखील नाही. या संदर्भात नेरळ कार्यालयात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. 
- शरीफ डोंगरे, बीएसएनएल ग्राहक, कळंब 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BSNL "not rechable" in Kalmb area