Budget 2019 : मुंबईतील रेल्वेसाठी 743 कोटींची तरतूद 

Budget 2019 :  मुंबईतील रेल्वेसाठी 743 कोटींची तरतूद 

मुंबई - हंगामी अर्थमंत्री तथा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 65 हजार 587 कोटींची तरतूद करण्यात आली. मुंबई उपनगरातील विविध एमयूटीपी प्रकल्पांसाठी 578 कोटी 70 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे एमयूटीपी 2, एमयूटीपी 3, एमयूटीपी 3 अ प्रकल्पातील विविध कामांना गती मिळणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असलेल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी 166 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. म्हणजेच एमयूटीपी आणि इतर प्रकल्पांसाठी एकूण 743 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) एमयूटीपी 2, एमयूटीपी 3 यांसह अनेक प्रकल्प प्रलंबित असून, एमयूटीपी 3 अ प्रकल्प अद्यापही कॅबिनेटच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. एमयूटीपी 2 मध्ये ठाणे-दिवा मार्गाचे दुहेरीकरण आणि पश्‍चिम रेल्वे मार्गांवरील मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका, तर मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला मार्गांवरील पाचवी आणि सहावी मार्गिकेचे रखडलेले काम पूर्ण होणार आहे. 

उपनगरी रेल्वेस्थानकांवर एकात्मिक सुरक्षा यंत्रणा, तिकीट यंत्रणा, पादचारी पूल, रेल्वे ट्रॅकची देखभाल आणि दुरुस्ती, सरकते जिने व लिफ्ट, वांद्रे स्थानकाच्या हेरिटेज वास्तूचे संवर्धन करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. हार्बर मार्गावरील 12 डब्यांच्या लोकलसाठी 5 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. याशिवाय पश्‍चिम रेल्वे मार्गावरील 15 डब्यांच्या लोकल धीम्या मार्गावर चालविण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यावरही भर देण्यात आला आहे. तसेच, रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी 49.07 कोटी मंजूर करण्यात आले आहे. 

मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली दरम्यान रेल्वेचा वेग वाढविण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पश्‍चिम रेल्वे मार्गावर दुसरे टर्मिनल, एटीव्हीएमची संख्या वाढविणे, चर्चगेट-विरार मार्गाची दुरुस्ती, परळ वर्कशॉपमध्ये एलएचबी कोचचे उत्पादन वाढविण्यावर भर, पादचारी पुलांसाठी 100.87 कोटी, तर विरारला रेल्वे दुरुस्ती डेपोसाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या तीनही टप्प्यांतील प्रकल्पांसाठी केलेली तरतूद सुखावणारी असून, त्यामुळे प्रलंबित प्रकल्पांना गती मिळेल. 
- आर. एस. खुराणा, व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com