भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणातील बांधकाम व्यावसायिकाला अटक

File Photo
File Photo

मुंबई : भिवंडी शहरातील शांतीनगर-पिराणीपाडा परिसरात असलेली मन्नत ही तळ मजला अधिक तीन मजली अनधिकृत इमारत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळून दोघांचा मृत्यू झाला; तर पाच जण गंभीर जखमी झाल्यानंतर या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या बांधकाम व्यावसायिकाविरोधात शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला रात्री अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे करणाऱ्या विकासक व नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या इमारत दुर्घटनेप्रकरणी प्रभाग अधिकारी व बीट निरीक्षक यांचीही सखोल चौकशी करणार असून त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी सांगितले आहे. मुन्नवर अली अन्सारी (३९) असे अटक केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. अन्सारी याच्या वडिलांनी पालिकेची कोणतीही परवागी न घेता बेकादेशीरपणे शहरातील शांतीनगर-पिराणीपाडा परिसरात मन्नत नाव असलेली तळ मजला अधिक तीन मजली ही अनधिकृत इमारत सहा वर्षांपूर्वी बांधली होती.

शुक्रवारी (२३) मध्यरात्री पाऊस सुरू असताना या इमारतीला तडे जाऊन ती पत्त्यासारखी कोसळली होती. या दुर्घटनेत सिराज अकबर अहमद अन्सारी (२६) व मोहमद आकीब शेख (२७) या दोघांचा मृत्यू झाला; तर पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांसह पाच जण गंभीर जखमी झाले. आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी केलेल्या तपासणीत ही इमारत अनधिकृत असल्याचे उघड झाले. त्यामुळे रणखांब यांच्या आदेशावरून प्रभाग अधिकारी सुनील भोईर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मुन्नवर अली अन्सारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

कारवाई अहवाल सादर कर
दरम्यान महापौर जावेद दळवी यांनी आज पुन्हा घटनास्थळी भेट देऊन आयुक्तांनी या दुर्घटनेटी सखोल चौकशी करून जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून अहवाल सादर करावा अशी सूचना केली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर चौकशीनंतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत आयुक्‍तांनी दिले आहेत.

भिवंडीतील अनधिकृत इमारत दुर्घटनेप्रकरणी प्रभाग अधिकारी व बीट निरीक्षक यांची सखोल चौकशी करून त्यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- अशोककुमार रणखांब
, आयुक्त, भिवंडी महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com