
Bullock Cart Race : 12 वर्षाचा महाराष्ट्राचा कायदेशीर संघर्ष आज फळाला; बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
डोंबिवली - सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींना परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्रातील बैलगाडा मालक व शर्यत प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही बैलगाडा शर्यतीची जुनी परंपरा आहे. बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवावी यासाठी गाडा मालक प्रयत्नशील होते.
अखेर न्यायालयाचा निकाल आला असून बैलगाडा मालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी देखील ट्विट करत या सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. बारा वर्षाचा महाराष्ट्राचा कायदेशीर संघर्ष आज फळाला आला आहे असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हणत गाडा मालकांची जणू भावनाच मांडली आहे.
गावागावांच्या होणाऱ्या जत्रा - यात्रांचे मुख्य आकर्षण असते ते बैलगाडा शर्यत... घाटात, मैदानात सर्वात कमी सेकंदात अंतर पार करणारी खिलारीची बैलजोडी म्हणजे गाडा मालकांची शान असते. मुंबई उच्च न्यायालयाने 2011 साली बैलगाडा शर्यंतींवर बंदी आणली होती. राज्य सरकारने देखील त्यासंबंधी परिपत्रक काढत बंदी जाहीर केली होती. त्यानंतर सातत्याने बैलगाडा मालक, शर्यत प्रेमींकडून बैलगाडा शर्यत सुरु करण्यात यावी याविषयी मागणी होत होती.
सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सशर्त तात्पुरती बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली होती. या अटी शर्थींची पूर्तता करणे बैलगाडा मालक, शर्यत आयोजकांना शक्य होत नसल्याने देखील त्यांच्यात नाराजीचे वातावरण होते.
त्यातही राज्यात मोठ्या प्रमाणात यावर्षी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल काय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे. न्यायालयाचा निकाल येताच बैलगाडा मालक, शर्यत प्रेमी यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.
पुणे जिल्ह्या प्रमाणेच ठाणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीची जुनी परंपरा आहे. जिल्ह्यात 20 हजाराहून अधिक गाडामालक आहेत. या भागात बदलापूर, भिवंडी, हेडुसण, खिडकाळी, अंतार्ली, उसाटणे आदि भागात बैलगाडा शर्यतींचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते. तर ग्रामीण भागातील बैल जोड्या या राज्यातील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठावी यासाठी ठाणे जिल्ह्यातील गाडा मालक देखील प्रयत्नशील होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाचा गाडा मालकांच्या बाजूने निर्णय आल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी देखील न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. पाटील यांनी ट्विट करत न्यायालयाचे आभार मानले आहेत.

काय आहे ट्विट
बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्र संस्कृतीचा अविभाज्य भाग! आज सर्वोच्च न्यायालयाने या शर्यतींवरची बंदी कायमची हटवली, ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. बारा वर्षांचा महाराष्ट्राचा कायदेशीर संघर्ष आज फळाला आला. महाराष्ट्राच्या मनातला निकाल दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार ! #Maharashtra
-प्रमोद (राजू) रतन पाटील महाराष्ट्र निर्माण सेना आमदार कल्याण ग्रामीण विधानसभा