बेशिस्त रेल्वे प्रवाशांवर कारवाईचा बडगा

वसई ः महिला डब्यांमध्ये जाऊन जनजागृती करताना रेल्वे पोलिस.
वसई ः महिला डब्यांमध्ये जाऊन जनजागृती करताना रेल्वे पोलिस.

वसई ः वसई-विरारमधील लाखो प्रवासी हे लोकलसाठी रोजच धावपळ करतात; मात्र अनेकदा रूळ ओलांडणे, दरवाजाजवळ उभे राहून वाट अडवणे आदी समस्यांमुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यातूनच होणारे अपघात, वादावादी, हाणामाऱ्या रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत वर्षभरात २ हजारांहून अधिक प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यात ५ लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे.

वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव ही वसई तालुक्‍यातील रेल्वेस्थानके आहेत. या ठिकाणाहून रोज चर्चगेट, बोरिवली, अंधेरीच्या दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची रोजची धडपड सुरूच असते; मात्र याचदरम्यान अनेक प्रवासी  दरवाजा अडवून उभे असतात, तर काही जण आपल्या सहकाऱ्याला जागा मिळावी, म्हणून लोकलमधील जागा अडवतात. यामुळे अनेक प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागत आहे. याचा ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आदींना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच विकलांग डब्यातदेखील सामान्य प्रवासी प्रवास करत असल्याने गैरसोय होत आहे.

यामुळे  रेल्वे सुरक्षा बलाने विशेष पथक तयार केले असून गर्दीच्या वेळी हे पोलिस सज्ज होऊन कारवाई करत आहेत. रेल्वे रूळ ओलांडू नये, जिन्याचा, भुयारी मार्गाचा वापर करावा, डबे अडवू नयेत, डब्यातून चढताना-उतरताना सावकाश प्रवास करावा, यासह विविध प्रकारची जनजागृतीदेखील केली जात आहे.

तक्रारींची तत्काळ दखल
प्रवाशांच्या तक्रारी व दरवाजा अडविणारे प्रवासी निदर्शनास आले, की रेल्वेकडून कारवाई केली जात आहे. प्रवाशांना अडचण निर्माण होऊ नये, व्यवस्थित प्रवास करता यावा म्हणून सुरक्षा बलाचे अधिकारी व जवान तत्काळ दखल घेत आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com