पोलादपूरजवळ भाविकांच्या बसला अपघात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

पोलादपूर- महाबळेश्वर- वाई- सुरूर राज्यमार्गावर अपघाताचे सातत्य कायम आहे. पोलादपूर आड येथे पंढरपूरहून विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या टेंपो ट्रॅव्हलरला अपघात होऊन १९ प्रवासी जखमी झाले.

पोलादपूर : पोलादपूर- महाबळेश्वर- वाई- सुरूर राज्यमार्गावर अपघाताचे सातत्य कायम आहे. पोलादपूर आड येथे पंढरपूरहून विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या टेंपो ट्रॅव्हलरला अपघात होऊन १९ प्रवासी जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातातील जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील उपचारासाठी तीन जखमींना महाडला पाठविले आहे.

याबाबत माहिती अशी, की खवटी (ता. खेड, जि. रत्नागिरी) येथील वारकरी व भाविक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. ते शनिवारी दर्शन आटपून परतताना महाबळेश्वर- पोलादपूर राज्यमार्गवर आड गावाजवळ आले असता टेंपो ट्रॅव्हलर वरील चालक नितेश बळिराम सावंत (वय २८, रा. चिंचली, ता. दापोली) हा घाट उतरत असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत गाडीचा ब्रेक लागत नसल्याचे माहिती असूनही बस वेगाने चालवत होता. त्या वेळी उतार असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या विरुद्ध दिशेच्या बाजूला जात रस्त्यालगत असलेल्या आंब्याच्या झाडावर आदळली. या बसमधील चालकासह १९ प्रवासी जखमी झाले. बसचालक नितेश सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus accident near Poladpur