व्यवसाय अभ्यासक्रमाच्या शिक्षकांना न्याय मिळणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाकडील विद्यार्थी व शिक्षकांच्या मागण्यासंदर्भात कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

मुंबई : उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाकडील विद्यार्थी व शिक्षकांच्या मागण्या लवकरच पूर्ण होणार आहेत. यासंदर्भात कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात व्होकेशनल टिचर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाकडील विद्यार्थी संख्या पूर्वीप्रमाणेच 20 असावी, या संघटनेच्या मागणीवर राज्यमंत्र्यांनी सहमती दर्शवत संचालकांना त्यासंदर्भात सूचना दिल्या. 

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा शासनाच्या सेवा शर्ती नियमावलीत समावेश नसल्याने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या प्रश्‍नावर पाटील यांनी संचालकांना या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या. तसेच मागील 25 ते 30 वर्षांपासून यंत्र सामुग्रीसाठी कोणतेही अनुदान दिले गेलेले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाचे योग्य प्रकारे प्रशिक्षण देता येत नसल्याने राज्यमंत्र्यांनी त्यासाठी अनुदान दिले आहे.

तसेच तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना 500 रुपये प्रति तास मानधन देण्यात यावे, तसेच पायाभूत अभ्यासक्रम हा विषय शिकविण्यासाठी एम. ए. अर्थशास्त्र ही शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरण्यात यावी, ही मागणीदेखील या बैठकीत आग्रहाने मांडण्यात आली.

त्यावर मानधन वाढीचा प्रस्ताव तत्काळ पाठविण्याचे निर्देश देण्याची सूचना देण्यात आली. तसेच शालेय कामकाजात पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक पदासाठी व्यवसाय अभ्यासक्रमाकडील शिक्षकांचा विचार करण्या संदर्भात तपासणी करण्याचे आणि शालेय शिक्षण 
विभागाप्रमाणे या शिक्षकांच्या संपकालिन रजा त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेशही मंत्र्यांनी दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Business course teachers will get justice