ठाणे जिल्ह्यात निवडणूक तक्रारींसाठी ‘सी व्हिजिल’ ॲप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

निवडणूक आयोगाने आचारसंहितेबाबत निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत तक्रार पोहचवण्यासाठी प्रत्यक्ष येण्याऐवजी ॲपवर तक्रार करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी ‘सी व्हिजिल’ ॲपची सुविधा असून या ऑपच्या माध्यामातून आचारसंहितेबाबत तक्रारी करण्याचे व्यासपीठ सर्वसामान्य मतदारांना उपलब्ध झाले आहे.

ठाणे : निवडणूक आयोगाने आचारसंहितेबाबत निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत तक्रार पोहचवण्यासाठी प्रत्यक्ष येण्याऐवजी ॲपवर तक्रार करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी ‘सी व्हिजिल’ ॲपची सुविधा असून या ऑपच्या माध्यामातून आचारसंहितेबाबत तक्रारी करण्याचे व्यासपीठ सर्वसामान्य मतदारांना उपलब्ध झाले आहे.

c. विशेष म्हणजे ही सुविधा सुरू झाल्यापासून अवघ्या काही तासांतच २२ तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल होत्या. त्यापैकी १६ तक्रारींवर तत्काळ कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. बॅनर अथवा इतर संबंधित विषयांवरील या १६ तक्रारी ठाण्यातील ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हिडीओ काढून तक्रार नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आलेल्या या तक्रारींची दखल घेण्यासाठी तीन शिफ्टमध्ये कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या ॲपवर तक्रार आल्यानंतर त्या तक्रारीची दखल घेऊन किमान शंभर मिनिटांतच कारवाई करून त्या तक्रारींची शहानिशा केली जात आहे.

काही सेकंदांत करा तक्रार
निवडणूक आयोगाकडे यापूर्वी आचारसंहितेची तक्रार करायची असल्यास जिल्हा स्तरावर अथवा तालुका स्तरावरील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात संपर्क साधावा लागत होता, पण त्यामुळे वेळेचा अपव्यय होत होता, पण आता या नव्या प्रणालीमुळे निवडणुकीच्या नावाने कोठेही प्रलोभने दाखवण्याचे प्रकार घडत असल्यास त्याची माहिती काही सेकंदांमध्ये निवडणूक आयोगापर्यंत पोचवणे शक्‍य झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'C Vigil' app for election complaints in Thane district