गृहिणींसाठी खुशखबर..! कोबी, फ्लॉवर गडगडली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 February 2020

वाशी कृषी उत्पन्न बाजारपेठेत कोबी, फ्लॉवरची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी घाऊक बाजारात कोबीच्या दरात 2 ते 3 रुपये, तर फ्लॉवरच्या दरात 4 ते 5 रुपये किलोपर्यंत घसरण झाली आहे. 

तुर्भे : वाशी कृषी उत्पन्न बाजारपेठेत कोबी, फ्लॉवरची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी घाऊक बाजारात कोबीच्या दरात 2 ते 3 रुपये, तर फ्लॉवरच्या दरात 4 ते 5 रुपये किलोपर्यंत घसरण झाली आहे. 

ही बातमी वाचली का? जळत्या दिव्याने केला घात

मकर संक्रांतीपासून फळभाज्यांची आवक हळूहळू वाढण्यास सुरुवात होते. सध्या, बाजारात आवक वाढली असली तरी मागणी घटल्याने फळभाज्यांसह पालेभाज्यांचे दर उतरले आहेत. फ्लॉवर, कोबी या फळभाज्यांसह अन्य पालेभाज्यांच्या दरात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या घाऊक बाजारात कोबी 2 ते 3 रुपये, तर फ्लॉवर 4 ते 5 रुपये दराने उपलब्ध आहे. सद्यस्थितीत कर्नाटक, गुजरात या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची आवक होत आहे. मात्र, पुरवठ्याच्या तुलनेत मागणी कमी असल्याने बाजारभावात मोठी घट झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत सरासरी 15 ते 20 ट्रक कोबी, फ्लॉवरची मागणी असते; परंतु सध्या पुणे, नगर, नाशिक येथून कोबी 30 ते 35 ट्रक; तर फ्लॉवर 40 ट्रकच्या आसपास आवक होत आहे. त्यातच नागरिकांची मागणीही कमी झाली आहे. त्यामुळे बाजारभाव गडगडल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. 

ही बातमी वाचली का? ऐन लग्न सराईत फुले स्वस्त

सद्यस्थितीत कांद्याचे दर चढे असल्याने हॉटेल, चायनीज सेंटरमध्ये कांद्याऐवजी मोठ्या प्रमाणात कोबीचा सलाडलाठी वापर केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय कोबी भजी, कोबी मंचुरण यांसारखे खाद्यपदार्थही बनविले जात आहेत. 

ही बातमी वाचली का? पालकांना दिलासा! अंगणवाडीत बालकांवर आता प्रथमोपचार 

शेतकरी चिंतातूर 
कोबी, फ्लॉवरचे दर घसरल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी, उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळणेही अवघड झाले आहे. वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने व्यापारी, तर पिकवलेल्या मालाचे मोल मिळत नसल्याने शेतकरी चिंतातूर आहेत. 

अवकाळी पावसामुळे पारंपरिक पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी फ्लॉवर, कोबी या कमी कालावधीत येणाऱ्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्यामुळे सध्या फ्लॉवर, कोबीची आवक अपेक्षेपेक्षा अधिक होत आहे 
- नितीन वाळुंज, भाजीपाला व्यापारी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cabbage, flower prices falling down