प्रचारात मानवी स्क्रीन

 रश्‍मी पाटील- सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

कारवाईपासून वाचण्यासाठी यंदाच्या निवडणुकीत बॅनरबाजी न करता मानवी स्क्रीन ठाण्यामध्ये फिरताना दिसत आहेत... 

ठाणे - पालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार सुरू असताना बॅनरबाजीवर कठोर कारवाई होत असल्यामुळे शहरात नाक्‍या-नाक्‍यांवर लागणारे बेकायदा होर्डिंग दिसेनासे झाले आहेत. निवडणूक म्हटली की, प्रचार गरजेचा ठरतो. उमेदवार या ना त्या मार्गाने प्रचार करण्याची खटपट करत आहेत. यंदा ठाण्यात डिजिटल प्रचारावर चांगलाच भर दिलेला दिसत आहे. अवाढव्य स्क्रीनपाठोपाठ आता मानवी स्क्रीनचा वापर सुरू झाला आहे. 

कारवाईच्या बडग्यापासून वाचण्यासाठी यंदाच्या निवडणुकीत बॅनरबाजी न करता मानवी स्क्रीन ठाण्यामध्ये फिरताना दिसत आहेत.  

शहरात विविध मतदारसंघात फिरणाऱ्या या स्क्रीन नागरिकांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहेत. परिसरात या स्क्रीन्स फिरू लागल्या की मतदार ‘हे काय नवीन’ असे म्हणत स्क्रीन पाहण्यासाठी क्षणभर थांबल्याशिवाय पुढे जात नाही. दीड बाय चार फूट असलेल्या या स्क्रीनवर मागील बाजूला पक्षाची निशाणी व त्याखाली उमेदवाराचे मोठे छायाचित्र लावले आहे. पुढच्या बाजूला स्क्रीनधारी व्यक्तीच्या डोक्‍याच्या वर असलेल्या छोट्या स्क्रीनवर त्या उमेदवाराची माहिती व कामाचा आढावा घेणारी  माहिती अथवा चित्रफीत फिरत असते. ही स्क्रीन दप्तराप्रमाणे खांद्यावर लटकवून फिरवता येते. पैसे घेऊन काही तास प्रभागात नाक्‍या-नाक्‍यांवर संध्याकाळच्या वेळी फिरणाऱ्या या मानवी स्क्रीन एका चौकात १५ ते २० मिनिटे थांबल्यावर पुढील चौकात जाऊन थांबतात. अशा प्रकारे संध्याकाळी या फिरत्या स्क्रीनचा प्रचार जोरदार सुरू आहे. इतरांप्रमाणे स्क्रीन घेऊन चालता येत असल्याने त्याचा कुठेही, कुणाला अडथळा होत नाही. तसेच रात्रीच्या अंधारात चकाकणाऱ्या या स्क्रीन त्यावरील उमेदवार कोण हे पाहण्यास मतदारांना भाग पाडत आहेत.

मानवी स्क्रीन म्हणजे दुकानावर लावल्या जाणाऱ्या लाईटच्या बोर्डप्रमाणे आहेत. फायबरपासून बनवलेल्या या स्क्रीन वजनाला हलक्‍या असल्याने त्या खांद्यावर सहज अडकवून फिरवता येतात. यामध्ये मोठ्या बॅटरी असतात किंवा काही स्क्रीन चार्जेबल आहेत. काही स्क्रीनमध्ये पुढच्या बाजूस मोबाईलप्रमाणे छोटे सॉफ्टवेअर देऊन स्क्रीनवर एखादी चित्रफीत रेकॉर्डिंग करून लावता येईल अशी सोय केलेली असते.
- संदेश वायले, स्क्रीन विक्रेते.

Web Title: Campaigning for human screen