प्रचारासाठी यू-ट्युबचा आधार

रश्‍मी पाटील - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

ठाणे पालिका निवडणुकीत प्रचाराचे अनेक फंडे पाहायला मिळत आहेत...

ठाणे - ठाणे पालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढला आहे; मात्र नवोदित किंवा अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी अनेक युक्‍त्या लढवाव्या लागत आहेत. अनेक उमेदवारांनी यासाठी हायटेक प्रचारासोबत लाईव्ह व्हिडीओ तयार केले आहेत. या व्हिडीओमध्ये मॉडेलिंग, निवेदन करणासाठी त्या उमेदवाराच्या घरातील महिलांचाच समावेश आहे.

ठाणे पालिका निवडणुकीत प्रचाराचे अनेक फंडे पाहायला मिळत आहेत. उमेदवाराला मतदानाचे आवाहन करणाऱ्या संदेशात दिलेल्या लिंकवर क्‍लिक केल्यावर एखादी आजी येते आणि ‘पाच वर्षांतून एकदाच आम्हाला नगरसेवक पाहायला मिळतो. आम्हाला गरज लागली की ऑफिसात जाऊन बसले तरी भेटत नाही.’ त्यानंतर महाविद्यालयीन तरुणी येऊन शैक्षणिक व वाहतुकीच्या समस्या मांडून जाते. एखादी विवाहिता येऊन नागरी समस्यांचा पाढा वाचता वाचता सर्व प्रस्थापित पक्षांना अनेक वेळा संधी देऊन झाली. सामान्य नागरिकांच्या समस्या सुटल्या कुठे, असा प्रश्‍न उपस्थित करत आता वेळ आली आपल्यातील सामान्य तरुण, तडफदार व्यक्तीला निवडून देण्याची, असे आवाहन करते. अशा अनेक क्‍लिप सध्या यू-ट्युब, व्हॉट्‌सॲप, फेसबुक आणि मेसेज लिंकद्वारे फिरत आहेत.

स्मार्टफोन हाती घेऊन हातातील फोनवरच घरातील आई, बहीण, पत्नी आदी महिलांच्या समस्या मांडणाऱ्या व्हिडीओच्या माध्यमातून हे नवोदित उमेदवार प्रचारासाठी स्मार्ट क्‍लुप्त्या लढवत आहेत. यामध्ये घरातील हौशी महिलाही कुठेतरी लाईव्ह झळकण्याची हौस भागवून घेत आहेत.

महिलांचा समस्यांशी सामना
व्हिडीओ क्‍लिपमध्ये मुख्यत्वे महिलांचेच चित्रीकरण आहे. रोजच्या घरगुती व परिसरातील मूलभूत समस्यांशी महिलांचा जवळचा संबंध येतो. महिलांना रोजच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्रीकरण यात आहे. या व्हिडीओमध्ये फक्त महिलांनाच प्राधान्य देण्यात आले असून, समस्या मांडणारा एकही पुरुष नाही, हे विशेष.

Web Title: campaigning on Youtube