30 मिनिटांत पाेहचता येणार कांजूरमार्गहून शिळफाट्याला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

कांजूरमार्ग ते शिळ फाटादरम्यानच्या १.८ किमीलांबीच्या बोगद्याचे काम एमएमआरडीएने सुरू केले आहे

मुंबई : कांजूरमार्ग ते शिळ फाटा प्रवास आता अवघ्या ३० मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. या भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने बोगदा (टनेल) बांधण्याचे काम सुरू केले आहे. त्याशिवाय एमएमआरडीएने मेट्रो ४ च्या कारशेडची जागाही बदलली आहे. मेट्रो ४ च्या कारशेडसाठी पूर्वी निश्‍चित केलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागणार होती. वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांचा विरोध पाहता ती जागा बदलण्याचा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

कांजूरमार्ग ते शिळ फाटादरम्यानच्या १.८ किमी लांबीच्या बोगद्याचे काम एमएमआरडीएने सुरू केले आहे. त्याचे आतापर्यंत २० टक्के काम पूर्ण झाले आहे. काम पूर्ण होताच कांजूरमार्ग ते शिळ फाटादरम्यानचे अंतर अवघ्या ३० मिनिटांत पार करता येणार आहे. याशिवाय या मार्गाजवळून मेट्रो ६ चा मार्गही जातो. त्यामुळे मेट्रो ६ ने ओशिवरा ते भांडुप आणि तेथून शिळ फाट्यापर्यंत जाणे सहज शक्‍य होणार आहे. त्यामुळे ओशिवरा ते शिळ फाटा हे अंतर मेट्रो मार्गाने अवघ्या तासाभरात पूर्ण करणे शक्‍य होणार आहे.

कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रोचा मार्ग याच ठिकाणाहून प्रस्तावित असून ही मेट्रो शिळ फाटामार्गे जाणार आहे. त्यामुळे बदलापूर ते शिळ फाटा हे अंतर १५ ते २० मिनिटांवर येईल. ही मेट्रो सेवा पूर्णपणे कार्यरत झाल्यानंतर ओशिवरा ते कांजूरमार्ग आणि कांजूरमार्ग ते बदलापूर व्हाया शिळ फाटा हे अंतर एक ते सव्वा तासात पार करणे शक्‍य होईल.
- आर. ए. राजीव, आयुक्त, एमएमआरडीए


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: can be reached in just 30 minutes from kanjurmarg to shilphata, in mumbai