कालवाफुटीचे खापर उंदीर, घुशींवरच

Vijay-Shivtare
Vijay-Shivtare

मुंबई - अतिक्रमण आणि उंदीर, घुशी, तसेच खेकड्यांनी पोखरल्यामुळेच पुण्यातला मुठा कालवा फुटला, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केले.

गेल्या २७ सप्टेंबरला मुठा कालव्याची भिंत फुटल्याने सिंहगड रस्त्यावर पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले, तर अनेक जण बेघर झाले होते.

या संदर्भात शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. हा कालवा दुरुस्तीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, असे मान्य करत मुठा कालवा फुटल्या प्रकरणाची चौकशी येत्या १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे शिवतारे यांनी सांगितले. कालवा फुटल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन उपस्थित होते का, आपत्ती व्यवस्थापनाने काय कार्यवाही केली या संदर्भात, तसेच कालव्याच्या बाजूला बोअरवेल खोदून टॅंकर लॉबी सुरू असल्याचीही चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही शिवतारे यांनी या वेळी दिली.

या लक्षवेधीवर बोलताना गोऱ्हे यांनी, या कालव्याच्या काठाने बोअरवेल खोदल्या आहेत. त्यांतून टॅंकरच्या माध्यमातून पाणीचोरी होत आहे. त्याचबरोबर उंदीर आणि घुशींमुळे भिंत कमकुवत झाली आहे; मग एवढ्या दिवसांत जलसंपदा विभागाने पाहणी व उपाययोजना का केल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला.

या प्रश्नाला उत्तर देताना शिवतारे म्हणाले, की बोअरवेलच्या बाबतीत विद्यमान कालवा फुटी चौकशी समितीला पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत, त्याचप्रमाणे या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या चौकशीच्या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधींना बोलावण्यात येईल.

नवीन मुठा उजवा कालवा किलोमीटर शून्य ते १२ दरम्यान २०१४ ते २०१७-१८ या चार वर्षांत परिरक्षण व दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आलेला नाही. कालवा पुण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी सतत प्रवाही असल्याने व निधीची मर्यादा असल्याने खर्च झालेला नाही. २०१८-१९ या वर्षात केवळ १७ लाख १४ हजार एवढाच खर्च झालेला आहे.

तसेच, कालवा प्रवाह थांबवल्यानंतर पुणे शहर हद्दीतील नवीन मुठा उजवा कालव्याची इतर धोकादायक ठिकाणांची तातडीची दुरुस्ती यांत्रिकी विभागामार्फत पूर्ण करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com