रद्द विमान तिकिटांचा परतावा सव्याज मिळणार; केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

कृष्ण जोशी
Tuesday, 8 September 2020

लॉकडाऊन काळात विमानांची उड्डाणे रद्द झाल्याने सर्व प्रवाशांना त्यांच्या तिकिट रकमेचा परतावा पुढील सात महिन्यांत म्हणजेच 31 मार्च, 2021 पर्यंत देण्यात येणार आहे.

मुंबई : लॉकडाऊन काळात विमानांची उड्डाणे रद्द झाल्याने सर्व प्रवाशांना त्यांच्या तिकिट रकमेचा परतावा पुढील सात महिन्यांत म्हणजेच 31 मार्च, 2021 पर्यंत देण्यात येणार आहे. व्याजासह किंवा क्रेडिट कूपनमार्फत प्रवासाच्या स्वरुपात हा परतावा मिळेल, असे केंद्र सरकारने रविवारी (ता. 6) सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले आहे.  तसेच, ज्या विमान कंपन्यांना शक्य आहे त्यांनी पुढील 15 दिवसांत तिकिटांचा संपुर्ण परतावा द्यावा, असेही केंद्राने म्हटले आहे. 

'त्या' इशाऱ्यानंतर अदानी ग्रुपचे शिष्ठमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला; वाढीव वीजबिलांबाबत चर्चा

प्रवाशांवर या प्रस्तावामुळे अन्याय होणार नाही तसेच, आर्थिक अडचणीत सापडलेल्या विमान कंपन्यांनाही दिलासा मिळेल, असे मत यावर मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी व्यक्त केले. आता, याप्रकरणी 9 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यानंतर न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे. 
यासंदर्भात केंद्र सरकारने सर्व विमान कंपन्यांशी चर्चा केली. टाळेबंदीमुळे विमान प्रवास रद्द झाल्याने त्यास प्रवासी जबाबदार नाहीत. त्यामुळे नियमांनुसार प्रवाशांना संपूर्ण परतावा मिळणे आवश्यक आहे आणि कंपन्या असा परतावा नाकारु  शकणार‌ नाहीत. मात्र, टाळेबंदीमुळे काही महिने संपूर्ण विमान वाहतूकच रद्द झाल्याने विमान कंपन्या सुद्धा आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे केंद्राने दोघांनाही दिलासा देणारा तोडगा काढला, असे प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आले आहे. 

मंदिर उघडण्यासाठी मनसेचे आंदोलन; विरुपाक्ष मंदिराचे टाळे तोडून केली महाआरती

तसेच,विमान कंपन्यांनी प्रवाशांना 15 दिवसांत तिकिटांचा संपूर्ण परतावा द्यावा. परंतु ज्या विमान कंपन्या आर्थिक अडचणीत असतील त्यांनी प्रवाशांना तिकिटांच्या रकमेचे क्रेडिट कुपन द्यावे. त्याची मुदत 31 मार्च 2021 पर्यंत असेल. 1 जुलै 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीकरिता त्यावर नऊ टक्के व्याज मिळेल. प्रवासी हे कूपन 31 मार्च 2021 पर्यंत स्वतःसाठी वापरू शकतील किंवा ते इतरांनाही देऊ शकतील. त्यावरील प्रवासाचे ठिकाणही बदलता येईल. मात्र, त्याच्या दरातील फरक प्रवाशाला द्यावा लागेल, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. 

मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णवाढीचा भडका; BMC ने दिले 'हे' कारण

कूपन न वापरणाऱ्यांनाही दिलासा
विमान कंपन्यांनी दिलेले क्रेडिट कूपन 31 मार्च 2021 पर्यंत वापरणे प्रवाशांना शक्य झाले नाही तर, त्या प्रवाशाला व्याजासह संपूर्ण परतावा देणे विमान कंपनीला अनिवार्य आहे. या प्रस्तावात बुधवारी सर्वोच्च न्यायालयासमोर आम्ही आणखी काही सुधारणा करू, असेही मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी सांगितले. यासंबंधीच्या याचिकेत मुंबई ग्राहक पंचायतदेखील एक पक्षकार आहे.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Canceled air tickets will be refunded; Affidavit of the Central Government in the Supreme Court