रिक्षाचालक कर्करोगाच्या दारात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

मुंबईतील 45 टक्के रिक्षाचालकांमध्ये कर्करोगसदृश लक्षणे असल्याचा अहवाल कॅन्सर पेशंट ऍण्ड असोसिएशनने (सीपीएएने)मांडला आहे.

मुंबई - मुंबईतील 45 टक्के रिक्षाचालकांमध्ये कर्करोगसदृश लक्षणे असल्याचा अहवाल कॅन्सर पेशंट ऍण्ड असोसिएशनने (सीपीएएने)मांडला आहे. असोसिएशनने गेल्या वर्षीच्या डिसेंबर ते एप्रिल महिन्यातील उपनगरातील तीन हजार रिक्षाचालकांची तपासणी करून हा अहवाल मांडला आहे. त्यापैकी 85 टक्के रुग्ण तंबाखूसेवन करत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. 

कुर्ला, सांताक्रूझ, बोरिवली, गोरेगाव व मालाड या उपनगरांत "सीपीएए'ने रिक्षाचालकांचे आरोग्य तपासणी शिबिर घेतले होते. कान, नाक, घसा व दातांच्या डॉक्‍टरांनी त्यांची तपासणी केली होती. त्यातून अनेकांना प्लाकिया, सबम्युकस फायब्रॉसीस, बायोप्सी, एफएनएसी अशा विकारांनी ग्रासल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती "सीपीएए'च्या कार्यकारी संचालिका अनिता पीटर यांनी केली आहे. 

रिक्षाचालकांच्या तंबाखूसेवनामागे वाढती ताणतणावाची मानसिक स्थिती कारणीभूत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. रिक्षाचालकांना तंबाखूच्या सेवनामागील कारणे विचारली असता, त्यांनी मानसिक ताण घालवण्यासाठी आपण व्यसनांच्या आहारी जात असल्याचे सांगितले. याअगोदरही विविध अभ्यासांतून रिक्षाचालकांमध्ये सामान्य नागरिकांपेक्षाही ताणतणाव जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सीपीएए तणाव व्यवस्थापनाचे कार्यक्रम आखणार आहे. 

वाढत्या तंबाखूसेवनाची कारणे 
- व्यावसायिक ताणतणाव 
- भूक मारली जात असल्याने 
- प्रदूषणाचा त्रास 
- कुटुंबापासून दुरावलेपणा 

ज्या रिक्षाचालकांच्या तोंडामध्ये तंबाखू सेवनामुळे डाग दिसून आले आहेत, त्यांना "सीपीएए'च्या रोगनिदान केंद्रामध्ये नियमितपणे बोलावले जाईल. संस्थेमार्फत त्यांची विनामूल्य तपासणी केली जाईल. 
अनिता पीटर, कार्यकारी संचालिका, कॅन्सर पेशंटस्‌ एड असोसिएशन (सीपीएए) 

रिक्षाचालकांच्या झालेल्या तपासण्या 
या शिबिरांमध्ये कान, नाक, घसा, मान व डोक्‍याच्या चाचण्या केल्या जातात. त्यांत लरिंगोस्कोपी (आयडीएल), ओरल कॅव्हिटी-बुक्कल म्युकासोटी व्हिज्युअल तपासणी, हार्ड ऍण्ड सॉफ्ट पॅलेट, टंग ऍण्ड जीन्जीव्हो, बुक्कल सल्कस यांसारख्या तपासण्या केल्या जातात. त्यातून कर्करोगापूर्वी डाग असतील, तर त्याचे निदान होते. सर्जिकल तपासणीत संपूर्ण शरीर, गुप्तांग, रक्त व एचबी आदी तपासण्या केल्या जातात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cancer related symptoms in Mumbai autorickshaw drivers