आहे उसंत कोठे, येथे निवांत बसायला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सभा, बैठका, प्रचारफेऱ्या अशा व्यग्र दिनचर्येत रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य उमेदवार होते. त्यांना मतदानानंतरही दिलासा मिळाला नाही.

अलिबाग : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सभा, बैठका, प्रचारफेऱ्या अशा व्यग्र दिनचर्येत रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य उमेदवार होते. त्यांना मतदानानंतरही दिलासा मिळाला नाही. आहे उसंत कोठे, येथे निवांत बसायला, असे म्हणत ते निवडणूक खर्च, मतदारसंघाचा आढावा, आकडेवारी अशा कामांत मंगळवार सकाळपासूनच मग्न आहेत. निवडणूक निकाल गुरुवारी (ता. 24) लागणार आहे. 

विधानसभेसाठी सोमवारी मतदान झाले. त्यानंतर प्रमुख पक्षांचे उमेदवार विश्रांती न घेता कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधण्यासाठी बाहेर पडले. काहींनी तातडीने मतांचे गणित तपासण्यास सुरुवात केली. महाड मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार भरत गोगावले कार्यकर्त्यांच्या गराड्यात होते. विजयाच्या आशेने कार्यकर्तेही उत्साहात असल्याने मोबाईलवर बोलण्यासही त्यांना सवड नव्हती. अलिबाग मतदारसंघातील शेकापचे उमेदवार सुभाष (पंडितशेठ) पाटील यांनी सांगितले की, पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदानाचा आढावा घेतला. 

अलिबागमधील शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी हे कुसुंबळे येथील हाणामारी प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत होते. दुपारनंतरचा वेळ त्यांनी कोर्टात घालवला. 

पेण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रवीशेठ पाटील यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. त्यांनीही मतदानानंतर मंगळवारी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधण्यावर भर दिला. कर्जत मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनी दुपारनंतर विश्रांती घेण्यास पसंती दिली. 

विधानसभा निवडणूक निकालानंतर 26 व्या दिवसांत निवडणूक निरीक्षक येतात. त्यानंतर सात दिवसांत अंतिम निवडणूक खर्च द्यावा लागतो. उमेदवाराला 28 लाख रुपयांची खर्चमर्यादा आहे. त्यापेक्षा जास्त खर्च करणाऱ्या उमेदवाराला निवडणुकीच्या नियमानुसार कारवाई केली जाते. त्यामुळे अनेक उमेदवार दक्षता घेतात. 
- दत्तात्रय पाथरुट, खर्च सनियंत्रण समितीप्रमुख 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Candidate busy after election