उमेदवारांनो, सावधान! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने काढला फतवा... 

ठाणे - उमेदवारांनो, सावधान... पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांवर असलेल्या गुन्ह्यांचे विवरणपत्र त्यांच्या छायाचित्रासह पोलिस ठाण्यात झळकवले जाणार आहे. मतदारांना उमेदवारांची संपूर्ण माहिती असणे हा त्यांचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. न्यायालयाच्या या आदेशानुसार हा फतवा राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे. त्यानुसार, ठाणे पोलिस आयुक्तालयाने संपूर्ण तयारी केली असून समन्स, वॉरंट बजावण्यासह संवेदनशील भागात विशेष मोहीम राबवली जात आहे. 

ठाणे-मुंबई, उल्हासनगरसह राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार या पालिका प्रशासन निवडणुकींच्या तयारीला लागल्या आहेत. पोलिस दलही या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. निवडणुका निर्भय आणि पारदर्शक व्हाव्यात याबाबत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ए. एस. सहारिया हे नुकतेच ठाण्यात येऊन गेले. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने 2002 मध्ये काढलेल्या आदेशानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांच्या कृष्णकृत्यांची यादी जाहीर करण्यास सांगितले. त्यानुसार या पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या सगळ्या उमेदवारांची संपूर्ण माहिती मतदारांना व्हावी, या उद्देशाने ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्याचा तपशील स्थानिक पोलिस ठाण्यात लावण्यात येणार आहे. तसेच उमेदवाराने दिलेला प्रतिज्ञापत्रातील गोषवारादेखील वर्तमानपत्रांमधून प्रकाशित केला जाणार असल्याचे सहारिया यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार,विविध राजकीय पक्षातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि गेल्या पाच वर्षांत दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची तपशीलवर यादी बनवण्याचे काम सुरू केले आहे. 

...ही तर नाहक बदनामी 
अन्यायाविरुद्ध लढताना; तसेच गोरगरीब जनतेसाठी गुन्हे अंगावर घेतल्याने राजकीय गुन्हे दाखल होत असतात. तेव्हा निवडणूक आयोगाच्या फतव्यामुळे नाहक बदनामी होत असल्याची ओरड काही राजकीय नेते करीत आहेत; तर गुन्हेगारी पार्श्वभूमी चव्हाट्यावर आल्याने उमेदवाराचा खरा चेहरा समोर येईल, असं मतही काही नागरिक व्यक्त करीत आहेत. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीड महिन्यापासून पोलिसांनी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची शस्त्र परवाने, दंगल माजवणे या गुन्ह्यांची यादी तयार केली आहे. यात निवडणुकीसंबंधी गुन्हे असतील तर आठ दिवसांत चार्जशीट दाखल होऊन त्या याद्या स्थानिक पोलिस ठाण्यात लावल्या जातील. संवेदनशील भागात छापेसत्र; तसेच विशेष मोहीम राबवली जाणार आहे. ज्यांच्याकडे परवानाधारी शस्त्रे असतील त्यांनी ती जमा करण्याचे आदेश बजावले आहेत. 
- आशुतोष डुंबरे, ठाणे, पोलिस सहआयुक्त. 

Web Title: Candidates beware