Loksabha 2019 : थेट संवादासाठी ठाण्यात उमेदवार रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

लोकसभेचा प्रचार करण्यासाठी हातात केवळ १७ दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांनी थेट नागरिकांबरोबर संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे - लोकसभेचा प्रचार करण्यासाठी हातात केवळ १७ दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांनी थेट नागरिकांबरोबर संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. त्यातही अद्याप शिवसेना युतीचे उमेदवार राजन विचारे यांचे मेळावे सुरू असताना राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांनी मात्र थेट नागरिकांबरोबर संवाद साधण्यास सुरुवात केली होती. गुरुवारी विचारे यांनीही रस्त्यावरील रॅलीच्या माध्यमातून मतदारांबरोबर संवाद साधण्यास सुरुवात केली; पण या प्रचारापासून भाजपचे पदाधिकारी दूर असल्याचे पाहावयास मिळाले.

शिवसेनेच्या राजन विचारे यांच्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त कार्यकर्ता मेळावा घेऊन प्रचाराची आखणी केली जात आहे. त्यातही ठाणे शहर आणि ओवळा-माजिवडाचे मतदारसंघातील पदाधिकारी त्यासाठी आघाडीवर आहेत; पण विचारे यांनी अद्याप नागरिकांबरोबर थेट संवाद साधणारा प्रचार सुरू केलेला नव्हता. गुरुवारी शहरात रॅली काढून शिवसेनेकडून हा प्रचार सुरू करण्यात आला आहे; विशेष म्हणजे भाजपचे गटनेते नारायण पवार यांच्या प्रभागातून आज रॅली जाणार असतानाही त्यांना ऐनवेळी कळविण्यात आले होते. हीच स्थिती भाजपच्या इतर नगरसेवकांचीही होती. राष्ट्रवादीकडून नियमित माध्यमांऐवजी समाज माध्यमातून मतदारापर्यंत पोचण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. 

आघाडीत एकी
काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण म्हणाले की, बुथनिहाय मतदारांची यादी करून घरोघरी प्रचार करायला हवा. खासकरून मतदानाच्या दिवशी मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. काँग्रेसचे अध्यक्ष मनोज शिंदे यांनी म्हटले की, १२ दिवसांच्या प्रचाराचे नियोजन करून यादीतील बोगस मतदार शोधणे, मतदारांपर्यंत पोहोचणे याला प्राधान्य द्यायला हवे. अशाप्रकारे रॅली अथवा पायी प्रचार करताना राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रचार केला जात आहे. 

Web Title: Candidates in Thane for direct interaction on the road