नवी मुंबईत भरधाव कारने 7 जणांना चिरडले; दोघांचा मृत्यू (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

कामोठा वसाहतीमध्ये सायंकाळी सातच्या सुमारास एका भरधाव स्कोडा गाडीने कामोठे सेक्टर 6 येथील रामशेठ ठाकूर विद्यालयासमोर सुमारे सात ते आठ वाहनांना धडक देत पदपथावरील पादचाऱ्यांना चिरडले.

मुंबई : नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 6 वसाहतीमध्ये रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास भरधाव स्कोडा गाडीने सात जणांना चिरडले. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये सात वर्षांच्या चिमुरड्याचा समावेश आहे. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून एक जखमी महिला कामोठे येथील ओम साई रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे.

कामोठा वसाहतीमध्ये सायंकाळी सातच्या सुमारास एका भरधाव स्कोडा गाडीने कामोठे सेक्टर 6 येथील रामशेठ ठाकूर विद्यालयासमोर सुमारे सात ते आठ वाहनांना धडक देत पदपथावरील पादचाऱ्यांना चिरडले. या अपघातामध्ये वैभव गुरव (वय 32) आणि सार्थक चोपडे (वय 7) या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर सार्थक चोपडे याची आई साधना चोपडे (वय 30), प्रशांत माने, श्रद्धा जाधव (वय 31), शिफा सारंग (वय 16), आशिक पाटील (वय 22) अशी जखमींची नावे असून त्यांना कामोठा येथील एमजीएम हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर स्कोडा गाडी चालत चालक फरार झाला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: car driver loses control runs over two in Navi Mumbai