मुंबईच्या नॅशनल पार्कचा आणखी लचका तोडणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

जगभरात कोठेही राष्ट्रीय उद्यानात वाहने घेऊन जाण्यास परवानगी नाही. मुंबईतच थेट कान्हेरी गुफेपर्यंत वाहने नेली जातात. उद्यानात वाहनांच्या पार्किंगची सोय करण्याऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांची सोय करावी. वाहनतळाची आवश्‍यकता असल्यास प्रवेशद्वारावरच बहुमजली अथवा भुयारी वाहनतळ उभारावे. 
- डी. स्टॅलिन, पर्यावरण अभ्यासक

मुंबई : मेट्रोच्या कारशेडपाठोपाठ आता वाहनतळासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा लचका तोडण्यात येणार आहे. उद्यानातील एक हेक्‍टर भूखंडावर वाहनतळ उभारण्यात येणार असून, तिथे ६०० वाहने उभी करता येणार आहेत. वाहनतळासाठी चार वर्षांपूर्वी विकसित करण्यात आलेल्या कृष्णगिरी उपवनाचा बळी जाणार आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दररोज पर्यटकांच्या ४०० ते ५०० गाड्या येतात. त्यातील काही थेट कान्हेरी गुफेपर्यंत जातात. सध्या प्रवेशद्वार आणि वनराईत ४०० वाहने उभी करण्याची सोय आहे. ती अपुरी असल्याने ६०० वाहनांसाठी वाहनतळ बनविण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार त्यांनी प्रस्ताव केंद्र सरकाराला सादर केला आहे. केंद्र सरकारने जुलै २०१५ मध्ये त्याला मंजुरी दिली.


मोठ्या झाडांची कत्तल नाही 
उद्यानात असलेली मोठी झाडे पाडण्यात येणार नाहीत. रोपांचे स्थलांतर करण्यात येणार आहे, असा दावा उद्यान प्रशासनाने केला आहे. वाहनतळ प्रकल्पाचा उद्यानातील वनसंपदेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे केंद्र सरकारला पाठविलेल्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.


उद्यानात २०१३ मध्ये १० लाख खर्च करून ‘कृष्णगिरी’ उपवन बांधण्यात आले होते. त्या ठिकाणी वाहनतळ प्रस्तावित आहे. वाहनतळासाठी महापालिकेकडेही ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मागण्यात आले होते. त्यानुसार पालिकेच्या आर प्रभाग कार्यालयाने ऑगस्ट २०१६ मध्ये सूचना व हरकती मागविल्या. त्यावर कोणत्याही सूचना व हरकती न आल्याने ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पालिकेच्या महासभेत प्रशासनाकडून प्रस्ताव मांडण्यात आला. महासभेच्या या महिन्याच्या कामकाजात त्याबाबतचा प्रस्ताव चर्चेसाठी येणार आहे. त्याबाबत माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक आणि मुख्य वनरक्षक अन्वर अहमद यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही.

बहुमजली किंवा भुयारी वाहनतळाचा पर्याय
जगभरात कोठेही राष्ट्रीय उद्यानात वाहने घेऊन जाण्यास परवानगी नाही. मुंबईतच थेट कान्हेरी गुफेपर्यंत वाहने नेली जातात. उद्यानात वाहनांच्या पार्किंगची सोय करण्याऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांची सोय करावी. वाहनतळाची आवश्‍यकता असल्यास प्रवेशद्वारावरच बहुमजली अथवा भुयारी वाहनतळ उभारावे, असा पर्याय पर्यावरण अभ्यासक डी. स्टॅलिन यांनी सुचवला आहे.

Web Title: Car parking facility inside Sanjay Gandhi National Park