कापडी पिशव्‍या हाती घेत प्लास्टिकमुक्तीचे व्रत

अमित गवळे : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

सुधागड तालुक्‍यातील भार्जे गावचे रहिवासी असलेले विश्वास गजानन गोफण यांनी प्लास्टिकमुक्तीची चळवळ अधिक गतिमान व व्यापक करण्यासाठी एक लाख कापडी पिशव्या मोफत वाटण्याचे व्रत घेतले आहे.

पाली (वार्ताहर) : सुधागड तालुक्‍यातील भार्जे गावचे रहिवासी असलेले विश्वास गजानन गोफण यांनी प्लास्टिकमुक्तीची चळवळ अधिक गतिमान व व्यापक करण्यासाठी एक लाख कापडी पिशव्या मोफत वाटण्याचे व्रत घेतले आहे. गोफण यांनी आत्तापर्यंत ८० हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप केले आहे. त्यांनी पाली व परळीत शुक्रवारी (ता. १) घेतलेल्या कापडी पिशवीवाटप कार्यक्रमात प्लास्टिकमुक्तीसाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. 

२३ जून २०१८ ला सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय लागू केला असला, तरी आजही महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त झाला नाही. केवळ कायदे कठोर होऊन चालणार नाहीत, तर जनमानसात या संदर्भात जनजागृती आणि परिवर्तन घडवून आणणे गरजेचे असल्याचे गोफण यांनी सांगितले. नागरिकांनी या चळवळीला भविष्यात अधिक व्यापक स्वरूप देऊन पर्यावरण संवर्धन व जतन करण्यासाठी कापडी पिशवीचा वापर अधिकाधिक करावा, असे आवाहनही त्यांनी केले. पर्यावरणप्रेमी व तरुणांनीही या चळवळीत सहभाग घेऊन प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी हातभार लावावा. या चळवळीत लोकप्रतिनिधी, प्रशासन, सरकार यांनी ज्या प्रकारे सहकार्य करणे अपेक्षित होते, तसे सहकार्य मिळाले नसल्याची नाराजी त्यांनी या वेळी व्यक्त केली. 

राज्यात प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू असून, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या कापडी पिशव्या प्लास्टिक पिशव्यांना सक्षम पर्याय ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कामधंदा सांभाळून त्यांनी कापडी पिशव्या बनवणे आणि वाटणे हा छंद जोपासला आहे. सलग आठ वर्षे ते कापडी पिशव्या बनवत आहेत. ग्रामीण व शहरी भागात, तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांत पिशव्यांचे मोफत वाटप करत आहेत. या कामी त्यांना त्यांच्या कुटुंबीयांचेही सहकार्य लाभत आहे. विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला क्रीडा कार्यक्रमातही कापडी पिशव्या वाटप करून जनजागृती व समाजप्रबोधन करण्यावर गोफण यांनी भर दिला आहे. 

मोफत आणि सुलभ
गोफण यांनी स्वखर्चाने तयार केलेल्या कापडी पिशव्यात लहान व मोठ्या पिशव्यांचा समावेश आहे. बाजारात जाताना या पिशव्या सहजरीत्या खिशात ठेवता येतील अशा आहेत. नागरिकांनी लग्नकार्यात मिळालेले शर्ट पिस व पॅण्ट पिस घरात पडून न ठेवता कापडी पिशव्या निर्मितीसाठी द्याव्यात. त्या साहित्याचा योग्य वापर करून कापडी पिशव्या बनवून देण्याचे काम आम्ही करू, असे गोफण यांनी सांगितले.

समाजसेवेला हातभार
प्लास्टिकमुक्ती चळवळीबरोबरच ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘पाणी अडवा पाणी जिरवा’, तसेच ‘मुलगी वाचवा मुलगी शिकवा’, या चळवळीलाही गोफण यांनी हातभार लावला आहे. प्रेरणादायी संदेश कापडी पिशव्यांच्या माध्यमातून समाजमनावर बिंबवण्याचे काम ते करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Carrying Cloths bag in hand and massing Plastic free