कारशेडची जागा संवेदनशील नाही!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

गोरेगाव येथील आरे वसाहतीतील प्रस्तावित मेट्रो कारशेडवरून आता ट्‌विटरयुद्ध सुरू झाले आहे. संबंधित जागा चित्रनगरीसारखी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील नसल्याचा दावा एमएमआरसीने केला आहे.

मुंबई - गोरेगाव येथील आरे वसाहतीतील प्रस्तावित मेट्रो कारशेडवरून आता ट्‌विटरयुद्ध सुरू झाले आहे. संबंधित जागा चित्रनगरीसारखी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील नसल्याचा दावा एमएमआरसीने केला आहे.

आरे वसाहतीतील मेट्रोची प्रस्तावित कारशेड रद्द करण्याच्या मागणीला सामान्य नागरिकांबरोबरच चित्रपट कलाकारांनीही पाठिंबा दर्शवला आहे. काही अभिनेते आरेमधील झाडे वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर आता आरे बचाव मोहिमेने ट्‌विटरवरून ‘आरे ऐका ना’ या हॅशटॅगखाली अभियान सुरू केले आहे. त्याविरोधात मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या प्रकल्प संचालक अश्‍विनी भिडे स्वत: मैदानात उतरल्या आहेत.

‘आरे बचाव’ मोहिमेला ट्‌विटरवरून प्रत्युत्तर देताना एमएमआरसीने लगतच्या चित्रनगरीवरच बोट ठेवले आहे. कारशेडची प्रस्तावित जागा चित्रनगरीसारखी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील नाही, असे ट्‌विट एमएमआरसीने केले. तत्कालीन काँग्रेस सरकारने १९७० च्या दशकात चित्रनगरी उभारली. आता विरोधात असलेल्या काँग्रेसला मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले जात आहे.

...तर ११ हजार कोटींचे नुकसान
मेट्रोची कारशेड वेळेत तयार न झाल्यास पुढील प्रत्येक कामाला विलंब होईल. त्याची मोठी 
आर्थिक किंमत चुकवावी लागेल. मेट्रोचे डबे तयार आहेत,  सर्व गोष्टी नियोजित वेळेत न झाल्यास ११ हजार कोटींचे नुकसान होईल, असा दावा एमएमआरसीने केला आहे.

‘माहिती तपासून घ्या’ 
अभिनेत्री रविना टंडन हिने मेट्रो कारशेडच्या विरोधात केलेल्या ट्‌विटला एमएमआरसीच्या प्रकल्प संचालक अश्‍विनी भिडे यांनी तत्काळ प्रत्युत्तर दिले. कोणतीही भूमिका घेण्यापूर्वी माहिती तपासून घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. आरे बचाव मोहिमेचे ट्‌विट शेअर करताना रविनाने ‘चार लाख ८० हजार झाडे असलेले आरे जंगल नाही का’, असा प्रश्‍न केला होता. त्यावर ही झाडे संपूर्ण आरे परिसरातील असून, प्रस्तावित कारशेडच्या जागेतील नाहीत, असे त्यांनी नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Carshed space is not sensitive