एटीएम पूर्ववत होण्यास आणखी आठवडा लागणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

अशी करा मात... 
- कॅशलेस व्यवहार करा 
- पैसे काढण्यासाठी बॅंकेत जा 

मुंबई - अपुऱ्या चलनपुरवठ्याने कोलमडलेली एटीएम सेवा पूर्ववत होण्यास आणखी आठवडा लागण्याची शक्‍यता आहे. पुरेशा प्रमाणात चलन मिळत नसल्याने एटीएमऐवजी बॅंकांच्या संबंधित शाखेत रोख रक्कम ठेवली जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी कॅश काऊंटरवरून रोख घ्यावी, असे आवाहन बॅंकांनी केले आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातच चलन तुटवडा निर्माण झाल्याने रिझर्व्ह बॅंकेच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. बॅंका आणि रिझर्व्ह बॅंकेतील मतभेदांमुळे ग्राहकांना मात्र पैसे काढण्यासाठी भरउन्हात वणवण करावी लागत आहे. 

रोकड पुरवठा सुरळीत असल्याचा दावा रिझर्व्ह बॅंकेने केला असला तरी बॅंकांनी मात्र तो फेटाळला आहे. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून चलनपुरवठा कमी होत गेला. गेल्या आठवडाभरापासून मागणीच्या तुलनेत निम्म्याहून कमी रक्कम आरबीआयकडून मिळत असल्याचे खासगी क्षेत्रातील एका बॅंक अधिकाऱ्याने सांगितले. एटीएम व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांनीही रोख रकमेचा पुरवठा कमी होत असल्याचे मान्य केले आहे. फेब्रुवारीअखेर बॅंकिंग यंत्रणा नोटाबंदीतून सावरली होती. प्रत्येक एटीएमसाठी दर दोन ते तीन दिवसांनी 18 ते 20 लाखांचा भरणा केला जात होता; मात्र आता हे प्रमाण तीन ते पाच लाखांपर्यंत कमी झाले आहे. त्यातच पैसे काढण्याची मर्यादा शिथिल केल्याने जेमतेम पाच ते 10 ग्राहकांना एटीएममधून पैसे काढता येत आहेत. त्यानंतर दिवसभर एटीएममध्ये खडखडात पाहायला मिळत आहे. बॅंकांच्या "करन्सी चेस्ट'मधून चलनपुरवठा वाढवण्यावर भर दिला जात आहे. आठवडाभरात चलनपुरवठा वाढेल, असा विश्‍वास "आरबीआय'च्या अधिकाऱ्याने व्यक्त केला. दरम्यान, इतर राज्यांमध्ये चलनपुरवठा सुरळीत असून, केवळ महाराष्ट्रात टंचाई निर्माण झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

Web Title: Cash problem in ATM