सोळाव्या मजल्यावरून फेकल्याने मांजराचा मृत्यू

दीपक शेलार
रविवार, 16 डिसेंबर 2018

दरम्यान, मृत बोक्यावर मुंबईतील शासकीय पशु-प्राण्यांच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शनिवारी दुपारी बोक्याला घरी आणल्यानंतर शेख कुटूंबियांसह मांजरे आणि कुत्र्यांनी अन्न-पाणी सोडले आहे. शेख यांना दीड वर्षापूर्वी मुंब्र्यात जखमी अवस्थेत हा बोका आढळला होता.

ठाणे : घरात शिरतो म्हणून शेजाऱ्याने मांजराला (बोका) थेट इमारतीच्या 16 व्या मजल्यावरून फेकल्याची घटना शुक्रवारी ठाण्यातील घोडबंदर रोड, कासारवडवली येथील एव्हरेस्ट कंट्रीसाईट संकुलात घडली.

पर्शियन जातीच्या कुळातील हा बोका असून घरमालकाने त्याचे नाव सोनू असे ठेवले होते. उंचीवरून फेकल्याने या बोक्याचा मृत्यू झाला असून सोनुला फेकणाऱ्या शिवराम पांचाळ (64) या शेजाऱ्याविरोधात प्राणीमित्राकडून कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याच्या अधिनियमानुसार कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

घोडबंदर रोड येथील एव्हरेस्ट संकुलातील पेतोनिया बिल्डींगमधील फ्लॅट क्रमांक 1601 मध्ये ललिता गायकवाड या घरकाम करतात. त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, बिल्डींगमधील फ्लॅट क्रमांक 1401 मध्ये भाडय़ाने राहणारे अब्दुलगनी शेख (65) यांच्याकडे 8 पर्शियन मांजरे आणि एक कुत्रा आहे. यातीलच एक पर्शियन जातीचा सोनू नावाचा बोका आहे. सोनू बोका अधुन-मधुन बिल्डिंगमधील जिन्यात किंवा कुणाच्याही घरी फिरत असे. त्याचा कोणालाही त्रास नव्हता. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनाही सोनूचा लळा लागला होता. तरीही,शिवराम पांचाळ या शेजाऱ्याने घरात शिरतो म्हणून त्या बोक्यास थेट 16 व्या मजल्यावरील खिडकीतून फेकून दिले. उंचीवरून फेकल्याने बोका तोंडावर पडून बराच वेळ तडफडून गतप्राण झाला.हा सारा प्रकार सीसी टीव्हीमध्ये कैद झाला आहे. याबाबत गायकवाड या महिलेच्या तक्रारीवरून कासारवडवली पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, मृत बोक्यावर मुंबईतील शासकीय पशु-प्राण्यांच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शनिवारी दुपारी बोक्याला घरी आणल्यानंतर शेख कुटूंबियांसह मांजरे आणि कुत्र्यांनी अन्न-पाणी सोडले आहे. शेख यांना दीड वर्षापूर्वी मुंब्र्यात जखमी अवस्थेत हा बोका आढळला होता.

Web Title: Cat death due to throwing from the sixteenth floor in Mumbai

टॅग्स