CBIची सरसकट संमती रद्द, भाजपचा राज्य सरकारला सूचक इशारा

कृष्ण जोशी
Thursday, 22 October 2020

राज्यातील जनतेचे नुकसान होण्याची शक्यता आहे, असा सूचक इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.  

मुंबई:  राज्यातील कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्याची सीबीआयला आतापर्यंत असलेली सरसकट परवानगी (जनरल कन्सेंट) रद्द केल्याने केंद्र राज्य संबंध अधिकच बिघडण्याची शक्यता आहे.  त्यामुळे राज्यातील जनतेचे नुकसान होण्याची शक्यता आहे, असा सूचक इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.  

सध्या नैसर्गिक आपत्तीशी झुंजणाऱ्या महाराष्ट्राला केंद्राकडून मोठ्या मदतीची अपेक्षा असताना अशा अनाकलनीय निर्णयामुळे केंद्र राज्य संबंध अधिकच बिघडण्याची शक्यता आहे, अशा शब्दांत भातखळकर यांनी हा इशारा दिला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर लगेच समाजमाध्यमांवर व्हिडियो प्रसारित करून हा इशारा दिला आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून उलटसुलट चर्चा झाल्यानंतर राज्य सरकारने कालच वरील निर्णय जाहीर केला. आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही त्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. त्या निर्णयावर भातखळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अधिक वाचा-  मोदींचं भाषण छोटेखानी, डिसलाइक करण्यासारखे काही नव्हतेः शिवसेना

सीबीआयला असलेली ही संमती महाराष्ट्र सरकारने कोणतेही कारण न देता रद्द केली आहे. त्याची कारणे काय हे सरकारने जनतेला सांगितले पाहिजे. जेव्हा महाराष्ट्र नैसर्गिक आपत्तीशी झुंजत असताना राज्याला केंद्राकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आणि आवश्यकता आहे. अशा वेळी असा अनाकलनीय निर्णय घेतल्याने केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत कोणाला वाचविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे का आणि कोणत्या कारणांसाठी हा निर्णय घेतला आहे, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.

-------------------------

(संपादनः पूजा विचारे)

CBI cancels all consent BJP warns state government


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CBI cancels all consent BJP warns state government