ठाण्यात सीसी टीव्हीचे संरक्षण तकलादू!

ठाण्यात सीसी टीव्हीचे संरक्षण तकलादू!

ठाणे : अपुऱ्या मनुष्यबळामुळे सर्वत्र पोलिस उभे करणे शक्‍य नसल्याने परदेशातील पद्धतीनुसार मोठा गाजावाजा करून ठाणे शहरात सीसी टीव्हींचे जाळे उभारण्यात आले. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत हे सीसी टीव्ही उभारण्यात आले आहेत. ठाण्यातील नगरसेवकांच्या निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपये घेऊन बसविण्यात आलेल्या सीसी टीव्हींच्या कामगिरीचा दर्जा अतिशय सुमार असल्याची बाब सर्वसाधारण सभेत भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी उपस्थित केली. मुळात अनेक ठिकाणचे सीसी टीव्ही कॅमेरे बंदच असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. अशा वेळी नित्कृष्ट सीसी टीव्ही ठाण्यात बसवणाऱ्या या ठेकेदाराच्या एकूण कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. 

शहराच्या भौगोलिक रचनेनुसार एकूण एक हजार 600 सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापैकी एक हजार 200 कॅमेरे नगरसेवक निधीतून उभारण्यात आले आहेत; तर स्मार्ट सिटीच्या योजनेत चारशे सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मुख्य शहरातील चरई विभागातील एमटीएनएल, नौपाडा येथील ब्राह्मण सोसायटी, दगडी शाळेजवळ, गोखले रोड, मूस रोड आदीसह नौपाडा परिसरातील कॅमेरे बंद असल्याची माहिती मृणाल पेंडसे यांनी सभागृहात दिली. नगरसेवकांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये निधी घेऊन बसवलेले कॅमेरेच बंदच असतील तर असे कॅमेरे का बसवले, असा प्रश्न भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी उपस्थित केला. 

हे सर्व चांगल्या प्रतीच्या दर्जाऐवजी तकलादू चिनी बनावटीचे कॅमेरे बसवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या विषयावर भाजपला साथ देत शिवसेनेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी महापालिका प्रशासनावर टीकेची संधी साधली. शहराची सुरक्षा राखण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाची आहे. त्यामुळे सीसी टीव्ही बसवण्याचे काम पोलिसांनी योग्य प्रकारे केले असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. सुरक्षेचे काम ठाणे महापालिकेने आपल्या शिरावर घेतल्याने अशी परिस्थिती ओढवल्याची टीका त्यांनी केली. 

अहवाल तयार करून कारवाई 
अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी सीसी टीव्ही कॅमेरे योग्य पद्धतीने बसविण्यात आल्याची माहिती दिली. त्याचबरोबर सीसी टीव्हींच्या या सर्व यंत्रणेवर ऑनलाईन पद्धतीने महापालिकेकडून लक्ष ठेवले जात आहे. सीसी टीव्हीचे सर्व रेकॉर्डिंग हे हाजुरी येथील डेटा सेंटरमध्ये जमा होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याबाबत नगरसेवकांच्या काही शंका असल्यास या एकूण विषयाचा पंधरा दिवसात अहवाल तयार करून त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

कॅमरे चांगले, विद्युत विभागाचा दावा 
शहरात बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यात आली नसल्याचा दावा महपालिकेच्या विद्युत विभागाने केला आहे. हे कॅमेरे बसवताना एनएबीएलची मान्यता घेण्यात आल्यानंतर; तसेच या कॅमेऱ्यांची चाचणी केल्यानंतरच ते बसवण्यात आले आहेत. शहरातील गरजेनुसार प्रत्येक प्रभागात सुमारे सात कॅमेरे बसवण्यात आले आहेत. केवळ एखाद्या ठिकाणी तांत्रिक बिघाड झाला असेल अथवा विद्युतपुरवठा बंद झाला तर कॅमेऱ्याच्या कामात व्यत्यय येत असल्याचा दावा या विभागाकडून करण्यात आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com