पश्चिम रेल्वेवर धावणार सीसीटीव्हीयुक्त महिला लोकल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

महिला प्रवाशांच्या सोयीसाठी पश्‍चिम रेल्वे प्रशासनातर्फे खास तयार केलेली लोकल मंगळवारी ( ता. 5 ) संध्याकाळी महिला स्पेशल म्हणून चालविण्यात येणार आहे.

मुंबई : महिला प्रवाशांच्या सोयीसाठी पश्‍चिम रेल्वे प्रशासनातर्फे खास तयार केलेली लोकल मंगळवारी ( ता. 5 ) संध्याकाळी महिला स्पेशल म्हणून चालविण्यात येणार आहे. या गाडीच्या डब्यांमध्ये चांगली आसने, सामानासाठी जास्त जागा व सीसीटीव्ही असतील. या लोकलला महिला प्रवाशांचा किती आणि कसा प्रतिसाद मिळतो यानुसार अशा अन्य लोकल तयार करण्यात येणार आहेत.

5 नोव्हेंबर हा पश्‍चिम रेल्वेचा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त प्रवाशांच्या सोयींसाठी पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार महिलांसाठी खास तयार केलेली पहिली लोकल संध्याकाळी 6.15 वाजता महिला स्पेशल म्हणून चर्चगेट स्थानकातून निघेल. त्यानंतर ही सेवा कायमस्वरुपी होईल. 

महिला प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन या लोकलमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. सामानाकरिता जादा जागा, अधिक चांगली आसनव्यवस्था आणि डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. प्रथम श्रेणीच्या डब्यातील आसनव्यवस्था अधिक बळकट करण्यात आलेली आहे. डब्याला निळया रंगाऐवजी ब्राऊन रंग देण्यात आलेला आहे. सध्या ही एकच लोकल प्रायोगिक तत्वावर चालविण्यात येणार आहे. प्रवाशांकडून मिळणाऱ्या प्रतिसादानंतर अन्य काही लोकलच्या डिझाईनमध्ये अशापद्धतीने बदल केला जाईल. 

महिलांच्या प्रतिसादानंतर या लोकलमध्ये जरूर ते बदल करण्यात येतील. यासाठी उद्या संध्याकाळी प्रायोगिक तत्वावर चर्चगेट ते विरार पर्यंत ही गाडी चालविण्यात येईल. 
- रविंद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्‍चिम रेल्वे 

web title : CCTV attached Women railway will run on Western Railway


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CCTV attached Women railway will run on Western Railway