सीसी टीव्ही कॅमेरे गुन्हेगारांचे कर्दनकाळ 

सीसी टीव्ही कॅमेरे गुन्हेगारांचे कर्दनकाळ 

नवी मुंबई -  सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात लावण्यात आलेले सीसी टीव्ही कॅमेरे गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरत आहेत. सहा वर्षांत त्यांच्या मदतीने तब्बल 398 महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आले आहेत. 

नवी मुंबई पालिका आणि सिडकोने आयुक्तालयातील मुख्य चौक, वर्दळीची ठिकाणे, प्रवेशद्वार, बस आगार, रेल्वेस्थानक आदी आदी ठिकाणांवर सुमारे 543 सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. या अत्याधुनिक सुरक्षा प्रणालीचे नियंत्रण नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या सीबीडीतील मुख्य नियंत्रण कक्षातून करण्यात येत आहे. 

परिमंडळ-1 मधील ऐरोली ते सीबीडी-बेलापूरच्या दरम्यान डिसेंबर 12 पासून मे 2018 या कालावधीत विविध गुन्हे आणि घटनांशी संबंधित तब्बल 1 हजार 619 सीसी टीव्ही फुटेजची मागणी विविध पोलिस ठाण्यांकडून तपासासाठी करण्यात आली. त्यानुसार पोलिस आयुक्तालयातील केंद्रातील 1 हजार 152 सीसी टीव्ही फुटेजचे शोध घेत पुढील तपासासाठी विविध पोलिस ठाण्यांना देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी यातील 872 सीसी टीव्ही फुटेजच्या मदतीने तब्बल 300 गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद केले आहे, तर परिमंडळ-2 मधील खारघर, तळोजा, कळंबोली, नवीन पनवेल, पनवेल, उरण आदी भागांतील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमुळे गेल्या तीन वर्षामध्ये विविध प्रकारचे 98 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. परिमंडळ-2च्या हद्दीतील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतून ऑगस्ट 2016 ते डिसेंबर 2018 या तीन वर्षांच्या कालावधीत विविध गुन्ह्यांशी संबंधित 377 सीसी टीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली. यातील 312 सीसी टीव्ही फुटेज शोधून पुढील तपासासाठी देण्यात आल्यानंतर परिमंडळ-2 मधील विविध पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांशी संबंधित 214 सीसी टीव्ही फुटेजच्या मदतीने 98 गुन्हे उघडकीस आणण्यात तसेच या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. 

महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल 
2018 मधील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा सिरीयल रेपिस्ट रेहान कुरेशी, सराईत सोनसाखळी चोर फय्याज शेख या दोन महत्त्वाच्या आरोपींना पकडण्यात सीसी टीव्हीची मोठी मदत झाली. त्याशिवाय वाशीतून सहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून पसार झालेल्या रिक्षाचालकाला पकडण्यात, त्याचप्रमाणे कामोठ्यातील ज्वेलर्सला लुटलेली घटना, 2017 मधील बॅंक ऑफ बडोदावरील दरोडा, वाशीतील दरोडा, बेलापूरमधील क्रोमा शोरूमसमोर पार्क असलेल्या वाहनातून लॅपटॉप चोरी प्रकरणातील आरोपी आदी ठळक घटना सीसी टीव्हीमुळे उघडकीस आल्याची माहिती वायरलेस विभागाचे सहायक पोलिस आयुक्त प्रदीप कन्नलू यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com