#MahalaxmiExpress : मध्य रेल्वेमुळे 'एनडीआरएफ'ला सूचना मिळाली 12 तास उशिरा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

महालक्ष्मी एक्‍स्प्रेस शुक्रवारी रात्री आठ वाजून 32 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघाली. ही गाडी रात्री दहाच्या सुमारास बदलापूर-वांगणी या स्थानकांदरम्यान अडकली.

मुंबई : मुसळधार पावसात बदलापूर-वांगणी स्थानकांदरम्यान महालक्ष्मी एक्‍स्प्रेस अडकल्याच्या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या आपत्ती व्यवस्थापनातील ढिसाळपणा पुन्हा उघड झाला आहे. ही गाडी शुक्रवारी (ता. 26) रात्री दहा वाजता अडकली, तेव्हा रेल्वेचा आपत्कालीन संपर्क क्रमांक बंद होता. याबाबतची सूचना राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला (एनडीआरएफ) शनिवारी सकाळी दहा वाजता देण्यात आली. त्यामुळे तब्बल 14 तासांनंतर मदत व बचावकार्य सुरू झाले. या गाडीच्या भोजन डब्यात पुरेसे पाणीही नव्हते. दरम्यान, हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला होता. परंतु, एवढा पाऊस पडेल असे वाटले नाही, असे कारण रेल्वे प्रशासनाकडून दिले जात आहे. 

महालक्ष्मी एक्‍स्प्रेस शुक्रवारी रात्री आठ वाजून 32 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघाली. ही गाडी रात्री दहाच्या सुमारास बदलापूर-वांगणी या स्थानकांदरम्यान अडकली. त्यानंतर मध्यरात्री रेल्वे पोलिस आणि सुरक्षा दलाचे जवान गाडीपर्यंत पोहोचले. परंतु प्रवाशांनी त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला, त्यामुळे या पथकाने प्रवाशांना खाद्यपदार्थ आणि पाणी पोहोचवणे सुरू केले. त्यानंतरही मध्य रेल्वे मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग आली नाही. रेल्वे प्रशासनाने या घटनेची सूचना शनिवारी सकाळी दहा वाजता 'एनडीआरएफ'ला दिली. 

मुंबई आणि पुण्यावरून आलेल्या 'एनडीआरएफ'च्या पथकांनी दीड-दोन तासांत मदत व बचावकार्य सुरू केले. त्यांच्या मदतीला ठाणे महापालिकेचे आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक पोलिस व स्थानिक प्राधिकरणाचे पथक होते. रात्री दहा वाजता ही गाडी अडकल्यानंतर दोन तासांनी 'एनडीआरएफ'ला कळवले असते, तरी रात्री मदत व बचावकार्य करणे अवघड होते; परंतु रात्रीच 'एनडीआरएफ'ची पथके पाठवून पहाटेपासून बचावकार्य करता आले असते, असे आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. यापूर्वी 2017 मध्ये शीव स्थानकाजवळ पावसात लोकल अडकल्या होत्या. त्याबाबतची माहितीही रेल्वेने तीन ते चार तासांनी दिली होती. त्या घटनेतूनही रेल्वेने धडा घेतलेला नाही. 

आपत्कालीन स्थितीत सामान्य कार्यपद्धतीचा (एसओपी) अवलंब करायला हवा होता. 'एनडीआरएफ'ला शुक्रवारी रात्रीच कळवले असते, तर पहाटेपासूनच मदतकार्य करता आले असते. महालक्ष्मी एक्‍स्प्रेस अडकल्याची माहिती मध्यरात्रीच मिळाली होती, मुसळधार पावसाचा अंदाज होता; तरीही आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित प्राधिकरणाला माहिती न देणे हा प्रकार गंभीर आहे. 
- प्रताप करगोप्पीकर, माजी प्रमुख, मुंबई अग्निशमन दल 

उल्हास नदी भरून वाहू लागल्यामुळे महालक्ष्मी एक्‍स्प्रेस अडकली. नौदल, 'एनडीआरएफ', पोलिस आणि अन्य यंत्रणा शनिवारी सकाळपासूनच मदत व बचावकार्य करत होत्या. या गाडीतून 1,050 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याचप्रमाणे कल्याण ते कोल्हापूर अशी विशेष गाडी सोडण्यात आली. हे बचावकार्य 17 तासांनंतर पूर्ण झाले आहे. 
- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Centrak Railway disaster management was debacle NDRF receives alert 12 hours late