लोकल सुरु करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला मध्य आणि पश्चिम रेल्वेचं उत्तर

प्रशांत कांबळे
Thursday, 29 October 2020

कोविड-19 च्या नियमांचे पालन करून नियोजित वेळेत सरसकट लोकल प्रवासाला परवानगी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला पाठवला.  यासंबंधित मध्य, पश्चिम रेल्वे आणि रेल्वे पोलिस आयुक्तांना सुद्धा तसे पत्र दिले. राज्यसरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला पश्चिम आणि मध्य रेल्वेने उत्तर दिले आहे.

मुंबईः कोविड-19 च्या नियमांचे पालन करून नियोजित वेळेत सरसकट लोकल प्रवासाला परवानगी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला पाठवला.  यासंबंधित मध्य, पश्चिम रेल्वे आणि रेल्वे पोलिस आयुक्तांना सुद्धा तसे पत्र दिले. राज्यसरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला पश्चिम आणि मध्य रेल्वेने उत्तर दिले आहे. या प्रस्तावावर विचार विनिमय करून रेल्वेकडे त्यांचे मत राज्य सरकारने मागितले होते.

सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करून  उपनगरीय रेल्वे सेवेची क्षमता वाढवण्यास रेल्वे नेहमीच तयार आहे. या अतिरिक्त सेवा पुरवण्यासाठी  रेल्वे राज्य सरकारसोबत  काम करत आहे. त्याच्यासोबत सल्लामसलत करून निर्णय घेणार,  
असे मध्य आणि पश्चिम रेल्वेने संयुक्त प्रतिक्रिया दिली आहे.

 

सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करून उपनगरीय रेल्वे सेवेची क्षमता वाढवण्यास रेल्वे नेहमीच तयार असते. या अतिरिक्त सेवा पुरवण्यासाठी आम्ही राज्य सरकारसोबत सल्लामसलत करत आहे, मध्य रेल्वेने असे ट्विट केले आहे.

 

लवकरच सरसकट प्रवाशांना लोकलची सेवा सुरू करण्याचे संकेत नुकतेच आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले होते. त्यानंतर बुधवारी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी एक प्रस्ताव रेल्वेला पाठवला आहे. यामध्ये राज्य सरकारने प्रवाशांना परवानगी देताना, प्रवाशांची गर्दीचे नियोजन करण्यासाठी वेळेचे सुद्धा नियोजन करून दिले आहे.

28 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारकडून कोविड नियमावली पाळून सर्वसामान्य प्रवाशासाठी लोकल सेवा सुरू करण्याबाबत पत्र मिळालं. हा सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने वेगवेगळे  वेळापत्रकही दिलं आहे. यासाठी लोकल फेऱ्या वाढवण्याच्या सूचना राज्य  सरकारने केल्या आहेत. राज्य सरकारने सुचवलेल्या वेळापत्रकाबद्दल रेल्वेची भूमिका कळवण्याची विनंती केली आहे. 

त्यासोबतच लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची विनंती सुद्धा करण्यात आली आहे. यापुर्वी सुरूवातीला अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर सरसकट महिला आणि नुकतेच नोंदणीकृत वकील, न्यायालयातील क्लर्क आणि सुरक्षा रक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता राज्य सरकारने सरसकट प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा प्रस्ताव रेल्वेला दिल्याने लवकरच सामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

सध्या रेल्वे 1410 स्पेशल लोकल फेऱ्या चालवत आहे. सध्याच्या कोविड नियमावलीनुसार 12 डब्यांच्या लोकलमध्ये जास्तीत जास्त 700 प्रवासी बसू शकतात. या डब्यात साधारणपणे  1200 प्रवासी प्रवास करायचे.त्यामुळे सध्या रेल्वे 9,80,000 प्रवाशांसाठी 1410 लोकल फेऱ्या चालवत आहे.

पश्चिम रेल्वे राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावावर सेवा देण्यास तयार आहे. त्यासाठी राज्य सरकारसोबत यासंदर्भात चर्चा सुरू आहे. पश्चिम रेल्वेच्या 1367 एकूण गाड्या आहे. कोविड-19 पूर्वी 35 ते 36 लाख प्रवाशांची वाहतूक केली जात होती. मात्र, कोविडमूळे सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी यामध्ये 700 प्रवाशांप्रमाणे एका गाडीत सुमारे 10 लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. याप्रमाणेच राज्य सरकारला आम्ही माहिती देणार आहे.

सुमीत ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

अशा सुचवल्या वेळा

 • सकाळची पहिली लोकल ते 7.30 वाजता
 • यादरम्यान अधिकृत तिकीट आणि पास धारक सरसकट प्रवाशांना रेल्वेतून प्रवासाची परवानगी द्यावी.
 • सकाळी 8 ते सकाळी 10.30 वाजता
 • क्युआरकोड असणाऱ्या अत्यावश्य़क सेवेतील कर्मचारी, आणि ओळख पत्रासह अधिकृत पास किंवा तिकीट असलेल्या नागरिकांना प्रवासाची मुभा द्यावी
 • सकाळी 11 ते दुपारी 4.30 वाजता
 • ज्यांच्याकडे अधिकृत तिकीट किंवा पास आहे. अशा सर्वांना लोकल प्रवास करण्याची परवानगी द्यावी
 • दुपारी  5 ते 7.30 वाजता
 • क्युआरकोड असणाऱ्या अत्यावश्य़क सेवेतील कर्मचारी, आणि ओळख पत्रासह अधिकृत पास किंवा तिकीट असलेल्या नागरिकांना प्रवासाची मुभा द्यावी
 • रात्री 8 ते शेवटची लोकल
 • यादरम्यान अधिकृत तिकीट किंवा पास असलेल्या प्रवाशांना परवानगी द्यावी
 • महिलांसाठी दर तासाला एक महिला स्पेशल ट्रेन सोडण्यात याव्या.

----------------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Central and Western Railway response the government proposal start local train


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central and Western Railway response the government proposal start local train