केंद्रीय उत्पादन शुल्कच्या सहायक आयुक्ताला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

मुंबई - सव्वा कोटीची लाच घेतल्याच्या आरोपाखाली केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या सहायक आयुक्तासह खासगी व्यक्तीला सोमवारी (ता. 8) केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली. दोघांना 15 मेपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. सक्तवसुली संचालनालयातील (ईडी) एका प्रकरणात अटक टाळण्यासाठी ही रक्कम स्वीकारण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यात आणखी एकावर सीबीआयला संशय असून, अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

अशोक नायक असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. धनंजय शेट्टी या व्यक्तीलाही अटक करण्यात आली. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला 2016 मध्ये "ईडी'ने नोटीस पाठवली होती. त्यानंतर एप्रिल 2017 मध्ये स्वतःला ईडीचा अधिकारी म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने तक्रारदाराला दूरध्वनी करून अटक टाळायची असेल, तर एका व्यक्तीची भेट घेण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदाराला कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये उत्पादन शुल्क विभागातील सहायक आयुक्त (एलटीयू) नायक याला भेटण्यास सांगण्यात आले. तक्रारदाराने त्याची भेट घेतली असता, त्याने ईडीतील प्रकरणात अटक टाळण्यासाठी 15 कोटींची लाच मागितली आणि 25-30 टक्के रक्कम दोन दिवसांत देण्यास सांगितले.

सीबीआयने या प्रकरणी सापळा रचून अधिकाऱ्याला अटक केली. चौकशीत ही रक्कम त्याला एका खासगी व्यक्तीला द्यायची होती, असे स्पष्ट झाले. त्यानुसार संबंधित व्यक्तीलाही अटक झाली. तक्रारदाराला दूरध्वनी करणारा ईडीचा तो तोतया अधिकारी कोण, याबाबत सीबीआय तपास करत आहे.

Web Title: central production fee additional commissioner arrested