Central Railway : नाताळसाठी मध्यरेल्वेच्या ४२ विशेष गाड्या धावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Central Railway 42 special trains for Christmas holidays

Central Railway : नाताळसाठी मध्यरेल्वेच्या ४२ विशेष गाड्या धावणार

मुंबई : मध्य रेल्वेने हिवाळ्यासह नाताळच्या सुट्ट्यांसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता ४२ विशेष रेल्वे सेवा चालवण्याच्या निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंबई ते मडगाव, पुणे ते नागपूर, मुंबई ते मंगळूर, मुंबई ते नागपूर आणि पुणे ते अजनी या मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व गाड्यांचे आरक्षण ४ डिसेंबरला सुरू होईल.

यात ट्रेन क्रमांक ०१४४३ पुणे - अजनी साप्ताहिक एक्स्प्रेस ६ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२३ पर्यंत पुणे येथून दर मंगळवारी दुपारी ४.१५ वाजता सुटेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.५० वाजता पोहोचेल. ०१४४४ विशेष गाडी ७ डिसेंबर २०२२ ते ४ जानेवारी २०२३ पर्यंत बुधवारी अजनी येथून सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल. ०१४४९ मुंबई - नागपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ६ डिसेंबर २०२२ ते ३ जानेवारी २०२३ पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी रात्री सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचेल.

०१४५० स्पेशल एक्स्प्रेस ९ डिसेंबर २०२२ ते ७ जानेवारी २०२३ पर्यंत नागपूर येथून दर शुक्रवारी सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी मध्य रात्री पोहोचेल. ०१४५१ पुणे - नागपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ७ डिसेंबर २०२२ ते ४ जानेवारी २०२३ पर्यंत दर बुधवारी नागपूर येथून सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचेल. ०१४५२ विशेष एक्स्प्रेस ८ डिसेंबर २०२२ ते ५ जानेवारी २०२३ पर्यंत पुणे येथून दर गुरुवारी रात्री सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी मध्य रात्री पोहोचेल.

०१४५३ मुंबई - मंगळूर साप्ताहिक स्पेशल एक्स्प्रेस ९ डिसेंबर २०२२ ते ६ जानेवारी २०२३ पर्यंत दर शुक्रवारी सुटेल आणि मंगळूर जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल. ०१४५४ स्पेशल १० डिसेंबर २०२२ ते ७ जानेवारी २०२३ पर्यंत मंगळूर जंक्शन येथून दर शनिवारी सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी पोहोचेल. मुंबई - मडगाव साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १ जानेवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री सुटेल आणि मडगाव जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल. ०१४५६ स्पेशल मडगाव जंक्शन येथून २ जानेवारी रोजी सकाळी सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस पोहोचेल.

पुणे-अमरावती विशेष

मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पुणे आणि अमरावतीदरम्यान कुर्डूवाडी, लातूर, पूर्णा मार्गे विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या गाड्या उरुळी, दौंड जंक्शन, जिंती रोड, जेऊर, कुर्डूवाडी जंक्शन, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी जंक्शन, पूर्णा जंक्शन, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला जंक्शन, मूर्तिजापूर जंक्शन आणि बडनेरा जंक्शनवर थांबणार आहे.