उल्हासनगरात चादर गँगची दहशत

अजय दुधाणे
सोमवार, 17 डिसेंबर 2018

उल्हासनगर : कल्याणनंतर आता उल्हासनगर शहरात चादर गँगने चोरी केल्याची घटना घडली आहे. कल्याणमध्ये 3 दिवसांपूर्वीच चादर गँगने 2 मोबाईलच्या दुकानांवर डल्ला मारून तब्बल 23 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. त्यापाठोपाठ उल्हासनगरमध्ये रविवारी (ता. 16) पहाटेच्या सुमारास चादर गँगने मोबाईलचे दुकान फोडून सुमारे 46 लाखांचे मोबाईल लंपास केले.

उल्हासनगर येथील शिवाजी चौकात असलेल्या साऊंड ऑफ म्युझिक या दुकानात पहाटेच्या सुमारास चोरीची घटना घडली. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात चादर गँगची दहशत पसरली आहे. रविवारी पहाटे 5 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास 6 जणांच्या टोळीने साऊंड ऑफ म्युझिक या दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. पहाटेच्या सुमाराला 6 जणांची टोळी दुकानाजवळ आली. त्यांनी एका बॅगेतून चादर बाहेर काढली. त्यानंतर दुकानाच्या शटरसमोर चादर लावली आणि शटरचे टाळे तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी आयफोन, सॅमसंग, विवो व अन्य कंपनीचे सुमारे 46 लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरी केले. चोरट्यांनी मोबाईलचे रिकामे खोके दुकानात फेकून देत, त्यातील फक्त मोबाईल लंपास केले. यामुळे दुकानांमध्ये खोक्यांचा ढिगारा जमा झाला होता. 

सकाळी दुकानातील कर्मचारी दुकान उघडण्यास आले, तेव्हा त्यांना शटरचे टाळे तोडलेले आढळले होते. दुकानात प्रवेश केला असता सर्व सामान अस्तव्यस्त पडलेले दिसून आले. यावरून येथे चोरी झाल्याचे लक्षात आले. कर्मचाऱ्यांनी दुकानाचे मालक लक्ष्मण तेजुमल ब्रह्मणी उर्फ लाली यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. ब्रह्मणी यांनी दुकानात येताच लागलीच मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Web Title: Chadar Gang creating nuisance in Ulhasnagar